Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Aurangabad › विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर मोठा मोर्चा

विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर मोठा मोर्चा

Published On: Feb 07 2018 1:33AM | Last Updated: Feb 07 2018 1:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राज्यातील शिक्षकांची रिक्‍त पदे तत्काळ भरावी, सरळ सेवेतील 30 टक्के कपातीचे धोरण रद्द करावे, यासह विविध मागण्यांसाठी जय भगवान महासंघाच्या राज्य विद्यार्थी कृती समितीने विभागीय आयुक्‍तालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप, राज आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. मोर्चातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कावरील जीएसटी रद्द करावा. भरती प्रक्रियेसंदर्भात तामिळनाडू पॅटर्न राबवावा. आयोगाने चुकीच्या प्रश्‍नांचे स्पष्टीकरण द्यावे. योगेश जाधव यांना संरक्षण द्यावे, आदी मागण्यांचे फलक झळकावले होते.

परीक्षेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घ्यावी. सर्व परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवावे. एमपीएससीतील सर्व पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी. पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांची पूर्व परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात यावी. डमी रॅकेटची सीबीआय चौकशी करावी. प्रत्येक परीक्षेचा पेपर हा सिलॅबसवरच आधारित असावा, आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्‍तांना देण्यात आले. मोर्चात योगेश खाडे, सचिन डोईफोडे, विशाल सानप, योगेश जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.