Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › बोर्डाचा पेपर असल्याने भीती वाटतेय..!

बोर्डाचा पेपर असल्याने भीती वाटतेय..!

Published On: Feb 25 2018 1:34AM | Last Updated: Feb 25 2018 1:34AMऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप

‘बोर्डाचा पेपर असल्याने आम्हाला भीती वाटतेय,’ अशा तक्रारी करीत दहावी आणि बारावीचे घाबरलेले परीक्षार्थी समुपदेशकांकडे धाव घेत आहेत. परीक्षेच्या भीतीने एका विद्यार्थिनीने स्वतःला घरातच कोंडून घेतले होते, तर दुसर्‍या विद्यार्थ्यास पळून जावेसे वाटत होते. समुपदेशकांकडे येत असलेल्या कॉलमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत आहेत.

बोर्डाचा पेपर हा शब्दच काही विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करत आहे. मात्र अभ्यास करून न घाबरता पेपर सोडवा, असा सल्ला समुपदेशक देत आहेत. आत्मविश्‍वासाअभावी विद्यार्थी परीक्षेचा बाऊ करीत आहेत, तसेच घरातील वातावरणही त्यास जबाबदार असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. अभ्यास कर असा तगादा लावणे किंवा तुला काही येत नाही, तुझे कसे होईल, अशी वाक्ये सतत ऐकावी लागत असल्याने त्यांच्यात नकारात्मक विचार निर्माण होत आहेत, अशा परिस्थितीत पालकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक करायला हवी, असे मत समुपदेशकांनी व्यक्‍त केले आहे.
मला पळून जावेसे वाटतेय

सर, मला इंग्रजी तसेच हिंदी दोन्ही पेपर अवघड गेले आहेत. मला नापास होण्याची खूप भीती वाटतेय. मी घर सोडून पळून जाऊ का, मला नको वाटतेय आता ही परीक्षा. पुढील पेपर देण्याची माझी इच्छा नाही. बोर्डाची परीक्षा खूप अवघड आहे सर, असा कॉल एका परीक्षार्थ्याने केला. तर इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी सकाळी सकाळी एका मुलीने स्वतः रूममध्ये कोंडून घेतले.     

सकारात्मक बोला
भूतकाळात केलेल्या चुकांचा पाढा विद्यार्थ्यांसमोर वाचून त्यांची भूमिका नकारात्मक करू नका. त्यांचा आत्मविश्‍वास वाढवा. त्यांना परीक्षेची भीती दाखवू नका.
- डॉ. संदीप शिसोदे,
समुपदेशक.

आत्मविश्‍वास बाळगा
विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या भीतीमुळे आत्मविश्‍वास ढासळल्याने जे वाचले त्याचे विस्मरण होत आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास अभ्यास करून आपणास सर्व येते, असा आत्मविश्‍वास बाळगावा.
- डॉ. शशिमोहन शिरसाट, समुपदेशक