Tue, Mar 19, 2019 09:38होमपेज › Aurangabad › एसआरपीच्या भरतीत बनवेगिरी करणारे अटकेत

एसआरपीच्या भरतीत बनवेगिरी करणारे अटकेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिस भरतीत उंची वाढविण्यासाठी डोक्यात विंग घातल्याचा आणि पायाला (टाचेला) पाच रुपयांचे नाणे चिकटविल्याचा प्रकार गतवर्षी नाशिक आणि औरंगाबादेत समोर आला होता. यंदाही सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीत उमेदवारांनी बनवाबनवी केल्याचे उघडकीस आले. पाच कि.मी. धावण्याच्या चाचणीत दोघे अडीच-अडीच कि.मी. धावल्याचे समोर आले. १७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी चौकशी करून २९ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. 

रमेश शांताराम दांडगे (चेस्ट क्र. २८६३, रा. दहिगाव, ता. सिल्लोड) आणि अमोल लुकड वाणी (चेस्ट क्र. २८६५, रा. देहिगाव, ता. कन्नड) अशी बनवेगिरी करणार्‍या उमेदवारांची नावे असून त्यांना त्यांच्याविरुद्ध भारत बटालियन कँपचे सहायक समादेशक मोहंमद इलियास मोहंमद सईद (५४, रा. एसआरपीएफ कँप, सातारा परिसर) यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. सातारा ठाण्याचे हवालदार अर्जुन ढोले यांनी रमेश आणि अमोल या दोघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

याबाबत पोलिस निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले की, सातारा परिसरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या कँपमध्ये सध्या भरती सुरू आहे. ४५ जागांसाठी १२ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. १२ मार्चपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून मैदानी चाचणीसाठी प्रत्येक दिवशी ७५० उमेदवारांना बोलावण्यात येत आहे. मैदानी चाचणीसाठी १७ मार्च रोजी आलेल्या रमेश दांडगे आणि अमोल वाणी या दोघांची हजेरी झाली. उंची आणि छातीचे मोजमाप झाल्यावर त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात आला. मैदानी चाचणी सुरू झाल्यावर या दोन्ही उमेदवारांनी ‘शाळा’ केली. पाच कि.मी. धावण्याच्या चाचणीत दोघांनी रमेश दांडगे याने सुरूवातीला टोकन घेतले. तो अडीच कि.मी. धावल्यानंतर त्याने तेच टोकन अमोल वाणीला दिले. हा प्रकार भरती प्रक्रियेत समाविष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांच्या लक्षात आला नाही पण, धावणार्‍या इतर उमेदवारांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी याबाबत अधिकृतपणे वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन भरती प्रक्रियेचे व्हिडिओ शुटींग तपासण्याचे आदेश दिले. त्यात रमेश आणि अमोल यांची बनावाबनवी समोर आली. त्यानंतर २९ मार्च रोजी सहायक समादेशक मोहंमद इलियास यांच्या फिर्यादीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

दोन्ही उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद

दोन्ही उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. यापुढील कारवाई सातारा पोलिस करतील. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी कोणाच्याही आमिषाला बळी न पडता निसंकोचपणे वरिष्ठांकडे तक्रारी कराव्यात. आता मैदानी चाचणी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच लेखी परीक्षेसाठी यादी लावण्यात येईल.
-मोहंमद इलियास मोहंमद सईद, सहायक समादेशक, एसआरपीएफ कँप


  •