Mon, Apr 22, 2019 03:55होमपेज › Aurangabad › औरंगाबाद सेक्स रॅकेट : प्रोझोनमधील ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’

औरंगाबाद सेक्स रॅकेट : ‘स्पा’चे जगभर ‘जाळे’

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 12 2017 11:18AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटप्रकरणी चर्चेत आलेल्या प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा आणि डी स्ट्रेस हब’ या ‘फॅमिली स्पा’चे जगभर ‘जाळे’ असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दर दोन महिन्याला ‘स्पा’ सेंटरमधील तरुणींना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जात असून, काही महत्त्वाच्या लिंक मिळाल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी (दि. 7) प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा  व दी ट्रेस हब’ या दोन्ही ‘फॅमिली स्पा’मध्ये मसाज व कटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी देहविक्री करणार्‍या थायलंडच्या नऊ व दोन स्थानिक तरुणी, तसेच ‘स्पा’चा मुख्य व्यवस्थापक शशांक खन्नासह या कृत्यात सहभागी असलेले ‘स्पा’चे कर्मचारी सुनील कचरू नवतुरे (27, रा. मिसारवाडी), शेख तौफिक शेख अफसर (23, रा. बायजीपुरा, संजयनगर), राहुल माणिकराव नलावडे (28, रा. मिसारवाडी) या 14 जणांसह चार ग्राहकांना अटक केली होती. तसेच, आठ लाख रुपये रोकड आणि मोबाइल, लॅपटॉप मिळून साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक विद्या रणेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

येथे आहेत शाखा
कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, पोर्तुगाल, श्रीलंका, थायलंड, कतार, युनायटेड अरब अमिरात (यूएई), व्हिएतनाम, झाम्बिया, मोझाम्बिका आदी देशांत अनंतरा स्पा सेंटरच्या शाखा असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 

शशांक खन्नाचे सीडीआर तपासणार

प्रोझोन मॉलमधील दोन्ही ‘स्पा’ सेंटरचा व्यवस्थापक असलेला शशांक यशदीप खन्ना (28, रा. मालाड, मुंबई) याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली असून, त्याने अद्यापपर्यंत तोंड उघडले नाही. परंतु, त्याच्या मोबाइलचा सीडीआर तपासला जाईल. त्यातून काही धागेदोरे हाती लागतात का, याचा पोलिस शोध घेत आहेत. देहविक्रीचा गोरखधंदा करणार्‍या मुख्य सूत्रधारापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. लवकरच मोठा मासा गळाला लागेल, असा दावा पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी केला.

ग्राहकांना जामीन मंजूर

प्रदीप शंकरलाल शर्मा (52, रा. पवननगर, टीव्ही सेंटर), रोहन राजेंद्र कुलकर्णी (26, रा. रिलायन्स पंपाजवळ, सिडको), अकीब अक्रम खान पटेल (23, रा. उस्मानपुरा) व इराकी विद्यार्थी येमेन अब्दुल हमीद जोसेम यांना ‘स्पा’ सेंटरमध्ये रंगेहाथ अटक केली होती. न्यायालयाने या सर्वांना 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, सोमवारी सर्वांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली, असे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले.