Wed, Apr 24, 2019 19:57होमपेज › Aurangabad › टंचाईवर कपातीचा उतारा

टंचाईवर कपातीचा उतारा

Published On: May 09 2018 1:57AM | Last Updated: May 09 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मनपाच्या मुख्य जलवाहिनीवरूनच आतापर्यंत बारा उद्योगांना मुबलक पाणी दिले जात होते, परंतु शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती पाहता पालिकेने या उद्योगांच्या पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात केली आहे. त्यामुळे रोज 2 एमएलडी पाण्याची बचत होत आहे. परिणामी, शहराच्या पाणीपुरवठ्यात तेवढी वाढ झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली.

शहरात दोन-तीन महिन्यांपासून पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन असताना अनेक भागांना चार-चार दिवस पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. तर दुसरीकडे जायकवाडी ते औरंगाबाद शहर या दरम्यान मनपाच्याच मुख्य जलवाहिनीवरून बारा उद्योगांना आतापर्यंत मुबलक प्रमाणात तेही शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात होता. दै. ‘पुढारी’ने याबाबत 15 मार्च रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरच्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित करीत हा पाणीपुरवठा बंद करण्याची मागणी केली होती. त्यावर महापौरांनी या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. तरीही बरेच दिवस त्याची अंमलबजावणी झाली     नव्हती. आता पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती पाहता या कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात तब्बल 25 टक्क्यांची कपात केली आहे. पूर्वी या कंपन्यांना रोज चार तास पाणी दिले जात होते. आता ते 3 तासांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे रोज 2 एमएलडी पाण्याची बचत होत आहे. वास्तविक, उद्योगांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यासाठी जायकवाडी जलाशयावरच एमआयडीसीची स्वतंत्र यंत्रणा आहे. तरीही फारोळा शुद्धीकरण केंद्रात शुद्ध करण्यात आलेले पाणी औद्योगिक वापरासाठी पुरविले जात आहे. मनपाच्या दोन्ही पाणीपुरवठा योजना 1998 सालापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ताब्यात होत्या. त्याच काळात जीवन प्राधिकरणने मार्गस्थ ग्राहकांना कनेक्शन दिलेले आहेत. 

इतर अकरा जणांनाही पाणी
जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत मनपाच्या जलवाहिनीवर एकूण 23 मार्गस्थ ग्राहक आहेत. यामध्ये बारा कंपन्या आहेत. तसेच धनगाव, इसारवाडी, ढोरकीन, बिडकीन आणि कृष्णापूर या पाच ग्रामपंचायती, छावणी परिषद, लष्कर तळ, रेल्वेस्टेशन, वाल्मी, अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आदींचा समावेश आहे. 
 

Tags : aurngabad, water scarcity