Thu, Jul 18, 2019 10:12होमपेज › Aurangabad › लोकसभेसाठी हळद लागताच खोतकरांची आमदारकी धोक्यात

लोकसभेसाठी हळद लागताच खोतकरांची आमदारकी धोक्यात

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 12 2017 2:02AM

बुकमार्क करा

फुलंब्री : प्रतिनिधी

सिल्लोड शहराचा विकास रखडलेला असताना तेथील आमदार व त्यांचे पुत्र नगराध्यक्ष फुलंब्री येऊन विकासाच्या पोकळ गप्पा मारतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडून सत्ता असून विकास झालेला नाही. अर्जुन खोतकर यांना लोकसभेसाठी या आमदारांनी हळद लावली. ही हळद लागताच खोतकरांची आमदारकी धोक्यात आली, असा टोला आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी लगावला. फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्यास विकास कामांसाठी तत्काळ 25 कोटींचा विशेष निधी मंजूर केला जाईल, असे आश्‍वासही त्यांनी यावेळी दिले.

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाठ आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथे दानवे यांच्या सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, उपमहापौर विजय औताडे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, जि. प. सदस्य अनुराधा चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, प्रदीप पाटील, सभापती सर्जेराव मेटे, तालुकाध्यक्ष गोविंद वाघ, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सारंग गाडेकर, अश्फाक पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना दानवे म्हणाले, सिल्लोडचे आमदार काँग्रेसने पाळलेले कार्टून असून असून त्यांच्या भूलथापांना मतदारांनी बळी न पडता भाजपच्याच बाजूने कौल द्यावा, अशी आमदार सत्तार यांचे नाव न घेता टीका करत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुहास शिरसाठ आणि 17 नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन केले. जो पर्यंत सत्ता येत नाही, तोपर्यंत टक्कल ठेवण्याची भाषा सिल्‍लोडच्या आमदारांनी केली. त्यांनी आता सत्तेचे स्वप्‍त पाहू नये. पुढील सात जन्मही माझा पराभव त्यांना करता येणार नसल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले.

आज रोजी औरंगाबाद-जळगाव या रस्त्यासाठी 1 हजार 200 कोटी रुपयांचा केंद्र सरकारचा निधी मिळाला असून हे काम वेगाने सुरू आहे, तसेच राजूर-फुलंब्री-खुलताबाद-शिर्डी हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. यामुळे फुलंब्री शहराच्या चारही बाजूने हमरस्ते होत आहे. यानंतर फुलंब्री शहराचा विकास हा मोठ्या गतीने होणार आहे. दळण-वळण व्यवस्था प्रबळ होण्यासाठी रस्तेच आवश्यक आहेत. यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी विशेष भर दिला आहे. असा सर्व विकास आपल्या समोर आहे. या विकासावर आम्ही मतदान मागत आहोत. सत्ता दिली तर केंद्र व राज्य सरकार आपल्या पाठीशी राहणार असल्याचे दानवे यांनी यावेळी सांगितले. 

प्रारंभी प्रचार सभेपूर्वी शहराच्या भाजपच्या वतीने  मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. त्यानंतर या सभेचा समारोप जुन्या पोलिस ठाण्यासमोर घेण्यात आलेल्या प्रचार सभेत झाला.  कार्यक्रमास अप्पासाहेब काकडे, नाथा काकडे, संजय पाथ्रीकर, बाजार समितीचे संचालक रोषण अवसरमल, सांडू जाधव, दामोधर पाथरे, मोबीन पाशा यांच्यासह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांची उपस्थिती होती.