Tue, Jul 16, 2019 12:19होमपेज › Aurangabad › ‘पूर्व’त सेना बिघडविणार भाजपचे गणित!

‘पूर्व’त सेना बिघडविणार भाजपचे गणित!

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:42AMऔरंगाबाद : विनोद काकडे

औरंगाबाद विधानसभेच्या पूर्व मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने ‘अतूल’नीय अशीच कामगिरी केली. त्यावेळी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसलाच ‘हात’ दाखविण्याची किमया भाजपला साध्य करता आली ती ‘एमआयएम’च्या चमत्कारामुळेच!. त्या निवडणुकीत जसे एमआयएमने काँग्रेसचे गणित बिघडविले होते, तसेच यंदाच्या निवडणुकीत शिवसेना येथे भाजपचे गणित बिघडविणार, अशी चिन्हे दिसू लागले आहेत. 

औरंगाबाद पूर्व हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. येथून सलग दोन वेळा काँग्रेसने बाजी मारली. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार अतूल सावे यांनी काँग्रेसचे माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांचा पराभव करीत हा मतदार संघ काबीज केला. या निवडणुकीत सावे यांना 64 हजार 528 मते पडली. तर दुसर्‍या क्रमांकावर पहिल्यांदाच औरंगाबादेत निवडणुकीत उतरलेल्या ‘एमआयएम’चे गफ्फार कादरी होते. त्यांना तब्बल 60 हजार 268 मते पडली. हे सर्वांसाठीच अनपेक्षित व धक्कादायकच होते. ‘एमआयएम’च्या या चमत्कारामुळे काँग्रेसचे राजेंद्र दर्डा हे थेट तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना केवळ 21 हजार 203 मते मिळाली होती. शिवसेना उमेदवार माजी महापौर कला ओझा यांना कसाबसा दहा हजार मतांचा आकडा गाठता आला होता. 

विशेष म्हणजे ‘युती’ तुटल्यामुळे त्या निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात पहिल्यांदाच शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरविला होता. त्यातही अंतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या गटबाजीचा शिवसेनेला त्यावेळी मोठा फटका बसला. त्याचा थेट फायदा भाजपच्या सावे यांना झाला होता. सर्वमान्य आणि प्रबळ उमेदवार नसल्यामुळे सेनेची मते भाजपकडे वळली होती. ही बाब जशी भाजपला फावली, तशीच एमआयएमची पूर्वमधील ‘एन्ट्री’ काँग्रेसला भोवली. काँग्रेसची व्होट बँक असलेला मुस्लिम मतदार एकगठ्ठा एमआयएमकडे वळला. एमआयएमने काँग्रेसच्या विजयाचे गणितच बिघडून टाकले. त्याचा थेट फायदा भाजपच्या ‘अतूल’नीय कामगिरीवर झाला.   

तेथे एमआयएमचा उमेदवार नसता आणि शिवसेनेने तगडा उमेदवार दिला असता तर त्यावेळी भाजपला पूर्व काबीज करणे अवघड गेले असते किंवा शिवसेनेने आणखी थोडा जोर लावला असता तर कदाचित एमआयएमचा विजय झाला असता. 

सेना उतरविणार ‘तगडा’ उमेदवार
आगामी विधानसभेसाठी शिवसेनेने पूर्व मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. येथून शिवसेनेतर्फे राजेंद्र जंजाळ आणि राजू वैद्य या दोन इच्छुकांनी आपापल्या परीने तयारीही सुरू केली आहे. हे दोघेही सर्वच बाबतीत प्रतिस्पर्धी उमेदवारांना चांगली तगडी ‘फाईट’ देऊ शकतात.
विशेष म्हणजे ऐनवेळी विद्यमान महापौर नंदकुमार घोडेल यांच्यासारखा तगडा उमेदवार शिवसेनेकडून पूर्वच्या रिंगणात उतरविला जाऊ शकतो. हीच बाब भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण शिवसेना जितका तगडा उमेदवार मैदानात उतरविणार, तितकी भाजपच्याच व्होट बँकेला कात्री लागणार, हे निश्‍चित. आणि मागील निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर भाजपला येथून केवळ साडेचार हजार मतांनी विजय मिळवता आलेला आहे.