Wed, May 22, 2019 16:16



होमपेज › Aurangabad › शिवसैनिकांचा उगवत्या सूर्याला नमस्कार

शिवसैनिकांचा उगवत्या सूर्याला नमस्कार

Published On: Jan 26 2018 1:54AM | Last Updated: Jan 26 2018 1:54AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ही परंपरा आता शिवसेनेतही चांगलीच रुजली असल्याचा प्रत्यय गुरुवारी सायंकाळी विमानतळावर आला. जिल्ह्याचे नवे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत आणि माजी पालकमंत्री रामदास कदम हे गुरुवारी सायंकाळी एकाच विमानाने औरंगाबाद शहरात दाखल झाले. यावेळी पालकमंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदाच शहरात येत असलेल्या डॉ. सावंत यांचे शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसैनिकांनी विमानतळावरच जोरदार स्वागत केले.

त्याचवेळी तेथेच असलेल्या माजी पालकमंत्री कदमांकडे मात्र कुणी ढुंकूनही पाहिले नाही. ही अपमानास्पद बाब खटकल्यामुळेच की काय रामदास कदम दुसर्‍या दरवाजाने गुपचूप नांदेडसाठी कारने निघून गेले.   औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच    रामदास कदम आणि खा. चंद्रकांत खैरे यांच्यात सातत्याने खटके उडत होते. दोघांमधील हा वाद प्रचंड विकोपाला गेला होता. अखेर आपले वजन वापरत खैरे यांनी आठवडाभरापूर्वी रामदास कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात यश मिळविले. आता कदम यांच्याकडे नांदेडच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली आहे, तर औरंगाबादच्या पालकमंत्रिपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. दीपक सावंत यांना बसविण्यात आले आहे. 

या बदलानंतर तरी कदम आणि खैरे यांच्यातील वाद संपुष्टात येतील असे वाटत होते; परंतु ही धुसफूस आणि गटबाजी अद्याप संपलेली नाही. या गटबाजीचे दर्शन गुरुवारी विमानतळावर देखील झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री दीपक सावंत हे गुरुवारी सायंकाळच्या विमानाने मुंबईहून चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. त्यांच्यासोबतच नांदेडला ध्वजारोहणाला जाण्यासाठी रामदास कदम हे देखील त्याच विमानाने औरंगाबादेत दाखल झाले, परंतु आतापर्यंत प्रत्येक वेळी विमानतळावर जंगी स्वागत स्वीकारणार्‍या कदम यांना गुरुवारी मात्र वेगळाच अनुभव आला. सावंत यांच्या स्वागतासाठी खुद्द खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता विकास जैन, शहर संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विजय वाघचौरे, सुहास दाशरथे, माजी महापौर कला ओझा, नगरसेविका सुनील आऊलवार, किशोर नागरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

सावंत आणि कदम हे दोघे एकाच विमानातून उतरले. सावंत हे पहिल्यांदा प्रवेशद्वारातून बाहेर पडले. तेव्हा सेना नेते आणि पदाधिकार्‍यांनी सावंत यांचे जोरदार जंगी स्वागत तेथे केले. त्याच वेळी जवळच उभे असलेल्या रामदास कदम यांच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. ही बाब कदम यांच्याही लक्षात आली. आपला हेतुपुरस्सर अपमान करण्याच्या उद्देशाने आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवताच कदम यांनी विमानतळाच्या दुसर्‍या दरवाजाचा मार्ग धरला.  दुसर्‍या दरवाजाने ते बाहेर पडले. तेथून कारमध्ये बसून कदम नांदेडकडे रवाना झाले.