Mon, Aug 26, 2019 08:15होमपेज › Aurangabad › शरद पवार हे आर्थिक सुधारणांतील भागीदार 

शरद पवार हे आर्थिक सुधारणांतील भागीदार 

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 1:00AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

शरद पवार यांची दिलेल्या भक्‍कम पाठिंब्यामुळेच नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात आर्थिक सुधारणांचे धोरण राबविता आले. आपण केलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये ते समान भागीदार होते, अशा शब्दांत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शनिवारी शरद पवार यांच्या कार्याचा येथे गौरव केला. 

शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘पद्मविभूषण शरद पवार, द ग्रेट इनिग्मा’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते एमजीएम महाविद्यालयाच्या रुक्मिणी सभागृहात झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष धीरूभाई मेहता, डॉ. अफरोज अहमद, शेषराव चव्हाण, प्रतापराव बोराडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

‘1991 ते 96 या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मी अर्थमंत्री, तर पवार हे संरक्षण मंत्री होते. या काळात देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. अर्थव्यवस्थेत 
आमूलाग्र बदल कऱण्याची संकल्पना मी मांडली. त्यासाठी उदारमतवादी धोरण राबवून आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. गंभीर आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 15 हजार कोटी रुपयांची कपात मी सुचविली होती. पवार यांनी कसलाही विरोध न करता त्यास मान्यता दिली. आर्थिक सुधारणांबाबत घेतलेल्या सर्व निर्णयांना त्यांनी भक्‍कमपणे पाठिंबा दिला. एका अर्थाने ते आर्थिक सुधारणांमधील माझे समान भागीदारच होते,’ असे मनमोहनसिंग यांनी स्पष्ट केले. 

पवार यांच्यामुळेच 2004 या वर्षी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली, असे स्पष्ट करून देशाला लाभलेले सर्वात यशस्वी कृषिमंत्री आहेत, असे गौरवोद‍्गार मनमोहनसिंग यांनी काढले. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविताना पवार यांनी अनेक संकटांचा सामना केला. लातूरचा भूकंप, मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यांनी कुशलतेने हाताळली. त्यांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्र हे आघाडीचे औद्योगिक राज्य बनले. केंद्रीय मंत्रिमंडळातही अनेकदा कठीण प्रसंगी त्यांचे मार्गदर्शन लाभले, असे मनमोहनसिंग यांनी सांगितले. 

विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व मराठवाड्याचे नेते विनायकराव पाटील यांनी आपणास बारामतीतून पक्षाची उमेदवारी दिली. तेव्हापासून सलग 50 वर्षे मी निवडणुका जिंकल्या असून, मराठवाड्यामुळेच राजकीय जीवनात यशस्वी झालो, असे गौरवोद‍्गार पवार यांनी काढले. संत ज्ञानेश्‍वरांची जन्मभूमी मराठवाड्यातील. नेवासा येथे त्यांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली, तर आळंदी येथे समाधी घेतली. मराठवाडा आणि पुण्याचे असे ऐतिहासिक ऋणानुबंध आहेत. या  ऋणानुबंधाचा लाभ मिळाला, हा आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आपण मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.