Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Aurangabad › सेवा हमी कायद्याने जनता मालक : मुख्यमंत्री

सेवा हमी कायद्याने जनता मालक : मुख्यमंत्री

Published On: Jan 01 2018 8:11AM | Last Updated: Jan 01 2018 8:11AM

बुकमार्क करा
नांदेड : प्रतिनिधी

सेवा हमी कायद्याने जनतेला मालक बनविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंधार येथे केले. जनतेची कामे विहित मुदतीत न झाल्यास कारवाईची तरतूद या कायद्यात असल्याचे ते म्हणाले.

कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तुमच्या कामाचा निपटारा झाला नाही आणि पहिली तक्रार केल्यास अधिकार्‍याला पाचशे रुपयांचा दंड पडेल. दुसरी तक्रार केली तर पाच हजारांचा दंड राहणार आहे. वारंवार एखादा अधिकारी जनतेची कामे करीत नसेल तर त्यास घरचा रस्ता दाखविण्याची तरतूद कायद्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार अरुणा संगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री आ.विनायक पाटील, आ. तुषार राठोड, श्यामसुंदर शिंदे, नगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, भाजप जिल्हाध्यक्ष राम रातोळीकर, माजी आ. गुरूनाथराव कुरूडे, संतुकराव हंबर्डे, माजी खा. डी. बी. पाटील, प्रवीण चिखलीकर, देवीदास राठोड, ओमप्रकाश पोकर्णा, राजेश पवार उपस्थित होते.

मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम करण्यासाठी वॉटरग्रीडद्वारे गोदावरी खोर्‍याला 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून 50 टीएमसी पाणी आणले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयाच्या लोकार्पणानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. हाजीसय्या दर्गा व बोरीचा महादेव मंदिर विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी यावेळी 5 कोटी रुपयांची घोषणा केली. पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी पाणीपुरवठा योजनेची सरकारने केलेली कामे सांगितली. आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघातील मागण्या मांडल्या. सूत्रसंचलन पत्रकार विक्रम कदम यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी मानले.