Sun, Jan 20, 2019 06:09होमपेज › Aurangabad › हस्तांतरणाच्या नावाखाली शाळा खरेदी-विक्रीचा बाजार जोरात

हस्तांतरणाच्या नावाखाली शाळा खरेदी-विक्रीचा बाजार जोरात

Published On: Feb 14 2018 2:50AM | Last Updated: Feb 14 2018 2:24AMऔरंगाबाद : राहुल जगदाळे

‘हस्तांतरण’ या गोंडस नावाखाली तथाकथित शिक्षण सम्राटांनी शाळांच्या खरेदी-विक्रीचा बाजार मांडला आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील 12 प्राथमिक, तर 3 माध्यमिक अशा एकूण पंधरावर शाळांची विक्री करण्यात आली आहे. शाळेला मान्यता केव्हा मिळाली, अनुदान किती टक्के मिळते, मालमत्ता नावावर आहे का, अशा निकषानुसार 5 ते 25 लाखांपर्यंत शाळांची विक्री होत आहे.

शासनाचे वारंवार बदलते धारेण, वाढती स्पर्धा, विद्यार्थ्यांची कमतरता आणि डोईजड झालेला खर्च, यामुळे शाळा चालवणे शिक्षण सम्राटांना अवघड झाले आहे. मात्र, यावर त्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. शाळा चालवण्यास इच्छुक असलेल्या संस्था शोधून थेट विक्रीचा व्यवहार केला जात आहे. 

हस्तांतरणाच्या नावाखाली दरवर्षी दहा ते बारा शाळांचा व्यवहार होत आहे. इच्छुकही जुन्या मान्यता असणार्‍या शाळांसाठी पुढे येत आहे. 2012-13 पर्यंत विशेषतः इंग्रजी शाळांचा गल्लीबोळांत सुळसुळाट वाढला होता. 

त्यामुळे 2012-13 नंतरच्या शाळांना शासनाने एक एकर जागेची अट घातली. अशा शाळांना आता मोठी मागणी आली असून, त्यांचा भाव वधारला आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांत प्राथमिक दहा आणि माध्यमिक दोन ते तीन शाळांचे हस्तांतरणाचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त आहेत. ट्रान्स्फर ऑफ स्कूल कायद्यातील तरतुदीनुसार एका संस्थेकडून दुसर्‍या संस्थेकडे दिली जाते. मात्र, कायद्यानुसार याला शाळा विकणे, असे म्हटले जाऊ शकत नाही.

- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी