Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Aurangabad › शनिअमावास्याला चक्‍क स्मशानात भरली शाळा

शनिअमावास्याला चक्‍क स्मशानात भरली शाळा

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:58AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

आज अमावास्या आहे बाहेर जाऊ नको, काळी बाहुली, लिंबू ओलांडू नको, रात्रीच्या वेळी स्मशानभूमी जवळून जाऊ नको, यांसारख्या गोष्टींची भीती मुलांच्या मनात पालक निर्माण करतात. त्यामुळे मुले भूत, आत्मा यांसारख्या अंधविश्‍वासाच्या बाबींना घाबरतात. विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज व अंधविश्‍वास दूर करण्यासाठी शनिअमावास्याच्या दिवशी रात्री 9.30 ते 12.30 चक्‍क स्मशानात शाळा भरविण्यात आली. भूत, प्रेत, आत्मा याविषयीचे पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यात आले. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगाने एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला.

जालना रोडवरील मुकुंदवाडी स्मशानभूमीत इयत्ता नववी व दहावीच्या  शंभर विद्यार्थ्यांचा वर्ग भरविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी भोंदूबाबा, भूत यांची वेशभूषा केली होती. खरचं भूत असते का? अंधश्रद्धा काळी जादू असते का? हातचलाखी म्हणजे काय? विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले यांनी मार्गदर्शन केले. विज्ञान विषयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश दिला. तसेच यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे, शैलेंद्र विटोरे, मीनाक्षी विटोरे, पूजा पर्‍हे, डी. एल. गव्हाणे, विजय सोनवणे, संजय जाधव, डी. के. जाधव, अशोक पंडुरे आदी उपस्थित होते.

भोंदूबाबाची पोलखोल..

मांत्रिक लोक सर्वसामान्यांना कसे फसवतात यासंदर्भात विद्यार्थ्यांनी उद्बोधनपर नाटिका सादर केली. त्यात एक महिला भोंदूबाबावर विश्‍वास ठेवून त्याच्या जाळ्यात कशी फसते, परंतु शेवटी त्याची सत्यता समोर आल्यावर ती त्याला धडा शिकवते अशी नाटिका सादर करत जागृृती केली.