Tue, May 21, 2019 18:11होमपेज › Aurangabad › बोजगाव सरपंचास तीन वर्षे कारावास

बोजगाव सरपंचास तीन वर्षे कारावास

Published On: Jan 11 2018 1:38AM | Last Updated: Jan 11 2018 1:32AM

बुकमार्क करा
सिल्‍लोड : प्रतिनिधी 

खोटे व बनावट दस्तऐवज तसेच चुकीची माहिती सादर करून सरपंचाचे पद उपभोगल्या प्रकरणी बोजगावचे सरपंच हरिदास शेलार यांना सिल्‍लोड न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी व्ही. जे. चव्हाण यांनी तीन वर्षे कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, आरोपी हरिदास दगडूबा शेलार यांनी 2005 मध्ये जळकी घाट-बोजगाव ग्रुप ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढण्यासाठी दाखल केलेल्या निवडणुकीच्या नाम निदर्शन पत्रात 12 सप्टेंबर 2001 नंतर दोन अपत्यांपेक्षा जास्त अपत्ये असताना निरंक असे दर्शवले. ग्रामसेवाच्या खोट्या सहीचे दोन अपत्य असल्याचे बनावट प्रमाणपत्र खरे असल्याचे भासविले. बोजगाव ग्राम पंचायतीचे सरपंच पदाचा लाभ घेतला.
निवडणुकीतील पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष अंबादास देखणे (रा.जळकी घाट) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देऊन ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. या प्रकरणी त्यांना त्यावेळी अपयश आले होते, परंतु संतोष देखणे यांनी विधिज्ञ विजय मंडलेचा यांच्या मार्फत सिल्‍लोड न्यायालयात 18 ऑक्टोबर 2011 रोजी फौजदारी अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार वरील प्रमाणे हरिदास शेलार यांच्या विरुध्द कलम 420, 468 व 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.