Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Aurangabad › ‘समृद्धी’साठी पन्नास टक्के जागा ताब्यात

‘समृद्धी’साठी पन्नास टक्के जागा ताब्यात

Published On: Mar 18 2018 1:32AM | Last Updated: Mar 18 2018 1:32AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील साडेतेराशे हेक्टर जागा संपादित केली जात असून, गुढीपाडव्यापूर्वी सुमारे आठशे हेक्टर जागा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. एकूण मागणीपेक्षा पन्नास टक्के जागा ताब्यात आल्याने आता निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे. 

समृद्धीसाठी भूसंपादनाचा वेग मंदावलेला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 1347.72 हेक्टर जमीन प्रशासनाला हवी आहे. 6 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 792.03 हेक्टर जमीन प्रशासनाला मिळाली असून, यात 686.35 हेक्टर जमीन शेतकर्‍यांकडून घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच 105.68 हेक्टर सरकारी जमीनही या कामासाठी ताब्यात घेण्यात आली आहे. 

साडेतेराशे हेक्टरपैकी अर्धी जागा ताब्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यात येईल, तर 85 टक्के जागा मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दीड महिन्यापूर्वी दिली होती. पाडव्यापूर्वी पन्नास टक्के जागा मिळाल्यानंतर लवकरच या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. 

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी 1 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन भूसंपादनाचा आढावा घेतला होता. पंधरा दिवसांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले होते. मात्र, भूूसंपादनासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेले दर मान्य नसल्याने शेतकरी जमीन देण्यास नकार देत आहेत.शेतकर्‍यांची मनधरणी करत, एक-एका शेतकर्‍यांची जमीन घेण्याचे धोरण सध्या अधिकारी राबवत आहेत. त्यामुळे आठवड्याला चार-सहा रजिस्ट्री होत आहेत. 
 

Tags : samrudhhi, highway, Holding, fifty, percent, lands