Thu, May 23, 2019 04:19होमपेज › Aurangabad › सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’

सोशल मीडियाच्या ‘वावरात’ अफवांचे ‘पीक’

Published On: Jun 16 2018 8:57AM | Last Updated: Jun 16 2018 8:56AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

यंदा पुन्हा मराठवाड्यावर पाऊस रुसला आहे. शेतकरी हवालदिल झालेत. अजून खरिपाची पेरणी नाही. शेतात उन्हाळी नांगरटीच्या ढेकळांचा डोंगर आजही कायम आहे. अशाही परिस्थितीत सोशल मीडियाच्या ‘वावरात’ मात्र अफवांचे ‘पीक’ जोमात आहे. चोर आले, चोरी झाली, मुलांना पळविणारी टोळी आली, इकडे टॉर्च चमकली, तिकडे उजेड दिसला, अशा अनेक अफवा सोशल मीडियावरून पसरत आहेत. यातूनच वैजापूरमध्ये दोघांचा बळी गेला. पडेगावात दोघांना जमावाने बेदम झोडपले. वाळूजमध्ये संशयावरून एका महिलेला भररस्त्यात जमावाने मारहाण केली. सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय, हे खरे आहे. पण, या सोशल मीडियाने अनेकांची झोप उडवली. लोकांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण केला, हे नाकारून चालणार नाही. 

आठ दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या अफवांचे पेव फुटले आहे. संध्याकाळ झाली की जिल्ह्यात कुठे ना कुठे चोर आल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होते. तो प्रकार पोलिसांना समजतो आणि पोलिस घटनास्थळी रवाना होतात. तेथे गेल्यावर सर्व काही नॉर्मल असते. पोलिस ज्या ठिकाणी जाऊन आले तेथे चोर आले होते का?, असे विचारतात त्या ठिकाणच्या रहिवाशांमध्ये चोरीची भीती पसरते. पुन्हा त्यांना दूर कुठे तरी टॉर्च चकमलेली दिसली की ते लगेचच याची चर्चा गावभर करतात. हाच प्रकार पुन्हा पोलिसांना कळवितात. यात पोलिसांची धावपळ होते. वैजापूर, गंगापूर, लासूर स्टेशन, बिडकीन, खुलताबाद, कन्नड, वाळूज, हर्सूल या भागात दररोज अशा अफवा पसरू लागल्या आहेत. अफवा पसरविणारे सोशल मीडियावर जुने फोटो किंवा इकडचे-तिकडचे फोटो मिक्स करून व्हायरल करतात आणि त्यानंतर होणारे परिणाम पाहात बसतात. यात त्यांना टोकाचा आनंद मिळतो. पण, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की कायद्याने हा गुन्हा आहे. हा प्रकार उघड झाला तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अटक होऊ शकते. विशेष म्हणजे, यावर किती सरकारी मनुष्यबळ आणि पैसा खर्च होतो? याचाही ते विचार करीत नाहीत.

अफवा पसरविल्या म्हणून वैजापूरमध्ये तिघांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यात त्यांना अटक झाली आहे. दरम्यान, 8 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता वैजापूर तालुक्यातील चांडगाव व जरूळ शिवारात चोर असल्याच्या संशयावरून आठ जणांना गावकर्‍यांनी बेदम मारहाण केली होती. यात दोघांचा मृत्यू झाला होता. याची अधिक माहिती घेतली असता आठ जणांपैकी चौघे बीडचे, एक जण शिऊरचा आणि तिघे औरंगाबादच्या पडेगाव भागातील असल्याचे स्पष्ट झाले. बीडच्या चौघांपैकी दोघांवर पाकिटमारीचे गुन्हेही दाखल आहेत. ते संशयित आहेत यात शंका नाही. पण, त्यामुळे 400 लोकांवर गुन्हा दाखल झाला. 12 जणांना अटक झाली. तसेच या घटनेनंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी जमावाने संशयावरून अनेकांना बदडले. त्यामुळे नागरिकांनी केवळ अफवांवर विश्‍वास ठेवू नये. कोणी संशयित दिसला तर निव्वळ पोलिसांच्या भरवशावरही थांबू नये. संशयिताला पकडावे, त्याची विचारपूस करावी आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावे.

संशयाचे भूत; अफवांचे बळी :

सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या वापरामुळे जगातील कोणतीही बातमी बसल्याजागी काही मिनिटांत आपल्याजवळ येऊ लागली आहे. पण ती माहिती खरी आहे की खोटी याची पडताळणी न केल्यामुळे संशयाचे भूत गारुड घालू लागते. मनात घर करून बसलेला संशय काही केल्या आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मत, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्‍तिस्वभाव आहे. बर्‍याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि तो खूप घातक ठरतो. ती वेळ येण्यापूर्वीच त्या संशयाचा पुरेपूर बंदोबस्त केला पाहिजे. नाहीतर अफवांचे पेव फुटते आणि नाहक बळी जातात. याचा अनुभव वैजापुरात आला आहे.