होमपेज › Aurangabad › 33 कोटींची नुसतीच उधळपट्टी ठरेल

33 कोटींची नुसतीच उधळपट्टी ठरेल

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:03AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

दोन वर्षांपूर्वी मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसरात 33 कोटींचे डिफर्ड पेमेंटमधून रस्ते बनविण्याचा निर्णय महापालिकेने नुकताच घेतला आहे. मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी आधी ड्रेनेजलाईन टाकण्याचे नियोजनही करण्यात यावे, अन्यथा 33 कोटी रुपये निव्वळ पाण्यात जातील. पुन्हा ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामासाठी तयार केलेले रस्ते खोदले जातील. त्यामुळे ड्रेनेजलाईन व रस्त्यांच्या कामांचे एकाच वेळेस नियोजन करण्यात यावे. वेळप्रसंगी आधी ड्रेनेजलाईन तर नंतरच रस्त्यांची कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील विविध भागांत भूमिगत गटार योजनेची कामे सुरू आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्तेसुद्धा भूमिगतच्या कामासाठी खोदण्यात आले. मात्र त्यानंतर रस्त्यांची बोळवण केवळ पॅचवर्कवरच करण्यात आली, तर अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईननंतर रस्ते दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाअभावी आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नव्याने महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाई परिसरात 33 कोटींची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आठ कोटींच्या कामांच्या निविदा अंतिम टप्पात आल्या आहेत. उर्वरित 25 कोटींची कामे डिफर्ड पेमेंटमधून केली जाणार आहे. मात्र आधी ड्रेनेजलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

दोन्ही कामे नियोजनानुसार व्हावी :

नियोजनानुसार व दर्जेदारपणे ही रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम ड्रेनेजलाईन टाकावी व नंतर रस्त्यांच्या कामाला प्रारंभ करावा. तसेच दोन्ही कामे नियोजनपद्धतीने एकाच वेळेसही केली जाऊ शकतात अन्यथा ड्रेनेजसाठी पुन्हा रस्ता खोदणे म्हणजे पैशांची उधळपट्टी होय.

 - सुधीर फुलवाडकर, नागरिक