होमपेज › Aurangabad › शंभर कोटींच्या कर्जावर आयुक्त मांडणार भूमिका

शंभर कोटींच्या कर्जावर आयुक्त मांडणार भूमिका

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महानगरपालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा भूमिगत गटार योजनेचे कर्ज आणि सहायक नगर रचनाकार जयंत खरवडकर यांची फेसबुक पोस्ट या मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. या सभेत मनपा आयुक्त भूमिगतच्या कर्जावर त्यांची भूमिका मांडणार आहेत. 

भूमिगत गटार योजनेसाठी शासनाने मूळ योजनेनुसार मनपाला 292 कोटी रुपयांचे अनुुदान दिलेले आहे. आता मनपाला मंजूर निविदा दरातील फरकाची 98 कोटी 31 लाख रुपयांची रक्कम टाकायची आहे़  यासाठी प्रशासनाने पालिकेच्या मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर मागील चार-पाच सभांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे़  सर्वच पक्षांच्या सदस्यांनी कर्ज काढण्यास विरोध दर्शविला. तरीही महापौरांनी या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता हा प्रस्ताव प्रत्येक सभेत स्थगित ठेवला. मागील सभेत मनपा आयुक्तांनी या विषयावर प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी तीन दिवसांचा अवधी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता गुरुवारच्या सभेत आयुक्त दीपक मुगळीकर हे या विषयावर त्यांची भूमिका मांडणार आहेत. याशिवाय गुुरवारच्या सभेत खरवडकर यांच्या फेसबुक पोस्टचा मुद्दाही उपस्थित होण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी खरवडकर यांनी सभागृह आणि लोकशाहीची खिल्ली उडविणारी पोस्ट फेसबुकवर टाकली़  त्यानंतर काही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन खरवडकरांच्या निलंबनाची मागणी केली होती. आयुक्तांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खरवडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आता सभेतही सदस्यांकडून कारवाईची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.