Fri, Mar 22, 2019 22:50होमपेज › Aurangabad › भीती वाटते रस्ता ओलांडताना...

भीती वाटते रस्ता ओलांडताना...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

अपघात म्हटलं की अंगावर शहारे येतात. भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांच्या गराड्यातून रस्ता काढणे फार अवघड आहे. कधी गाडी अंगावर येईल व अपघात होईल यामुळे रस्ता ओलांडायची आता भीती वाटते, अशी भीती सेंट फ्रान्सिस शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढारीशी बोलताना व्यक्‍त केली. 

जालना रस्त्यावर भरधाव वेगाने जाणार्‍या स्पोर्ट बाईकवरील मुलाने रस्ता ओलांडणार्‍या सेंंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल (एसएफएस) या शाळेतील नववीच्या मुलीला धडक देत कारवर जाऊन आदळल्याची घटना शनिवारी (दि.25) दुपारी बाराच्या सुमारास घडली. त्यात मुलीला दुखापत झाली. यासारख्या घटना एसएफएस या शाळेसमोर नेहमीच घडत असतात. शाळेतील जवळपास तीन हजार विद्यार्थी आहेत. त्यातील सुमारे दीड हजार विद्यार्थी बायजीपुरा, रोशनगेट, कैसर कॉलनी, संजयनगर, सिडको-हडको तसेच रस्त्याच्या पलीकडील भागांतील असल्याने रोज रस्ता ओलांडून विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. सेव्हनहिल उड्डाण पुलावरून उतार असल्याने भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना मुलांचे लहान-मोठे अपघात सतत घडत आहे. त्यात अनेकांना लहान-मोठ्या स्वरुपात दुखापतही होत आहे. होणारे अपघात टाळता यावे, तसेच विद्यार्थी सुरक्षित व सावकाशरीत्या घरी पोहचावेत म्हणून प्रशासनाने या रस्त्यावर स्कायवॉक तयार करावा किंवा किमान गतिरोधक तरी बसविण्यात यावे, अशी मागणी शाळा तसेच पालक करत आहे.