Tue, Nov 20, 2018 16:58होमपेज › Aurangabad › पिण्याच्या पाण्याने धुतले रस्ते, पूल

पिण्याच्या पाण्याने धुतले रस्ते, पूल

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 12:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एकीकडे शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू आहे. भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. महापालिकेकडूनही नागरिकांना अनियमित, अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. मनपाच्या जलकुंभांमध्ये पुरेसे पाणी येत नसल्याचे सांगत चार, पाच आणि तब्बल आठ दिवसानंतर काही लिटर पाणी सोडले जात आहे, तर दुसरीकडे शहरातील रस्ते आणि उड्डाणपूल धुण्यासाठी लाखो लिटर पिण्याचे पाणी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 मनपाच्या वतीने सोमवारी (दि. 30) शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि. 28) मनपा अधिकारी, वॉर्ड अधिकारी आणि कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्वच्छता अभियानाच्या वार्ड अधिकार्‍यांनाही विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्ष महास्वच्छता अभियान राबविताना शहरातील काही रस्ते आणि जालना रोडवरील तिन्ही उड्डाणपुलांना चक्क अंघोळ घालण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात आला. सिडको एन-7 आणि एन-5 येथील जलकुंभांवरून टँकरद्वारे लाखो लीटर पिण्याचे पाणी आणून मोंढा नाका, सेव्हन हिल आणि सिडको उड्डाणपुलांना अंघोळ घालण्यात आली आहे. स्वच्छता अभियानाच्या नावाने लाखो लिटर पिण्याचे पाणी असे रस्त्यावर घालणार्‍या मनपा प्रशासनाविषयी नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.