Tue, Mar 26, 2019 23:52होमपेज › Aurangabad › न्यायनगरात दोन गट भिडले : परिस्थिती नियंत्रणात 

न्यायनगरात दोन गट भिडले : परिस्थिती नियंत्रणात 

Published On: Jun 05 2018 11:57PM | Last Updated: Jun 05 2018 11:56PMऔरंगाबाद: प्रतिनिधी

दोन गटात झालेल्या वादातून जुन्या शहरातील काही भागात दंगल उफाळून आली होती. या घटनेला महिनाही झालेला नाही असे असताना, मंगळवारी रात्री साडेदहा अकरा वाजता न्यायनगरात तरुणांचे दोन गट भिडल्याने दगडफेक, जोरदार हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच दंगाकाबू वाहनांसह सुमारे शंभर-एक पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी धडकले. पोलीसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर सुमारे शे-दोनशेचा जमाव पुंडलिकनगर पोलीस ठाण्यासमोर जमला होता. मात्र पोलीसांनी त्यांनाही पिटाळून लावले.

किरकोळ वादातून तरुणांच्या दोन गटातील भांडणाने अख्खा औरंगाबाद शहराला वेठीस धरले होते. मे महिन्यात ११-१२ रोजी झालेल्या दंगलीने औरंगाबाद शहर होरपळून निघालेले आहे. दंगलीला पोलीसांचा हलगर्जीपणाही कारणीभूत असल्याचा आरोप झाला होता. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी रात्री न्यायनगरात घरासमोर उभे राहण्याच्या कारणांवरून तरुणांच्या गटात वाद झाला. या वादातून किरकोळ दगडफेक व जोरदार हाणामारीही झाली. या घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण शिनगारे, गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी आणि दंगाकाबू पथक वाहनांसह घटनासह धडकले. पोलीसांनी जमावाला पांगवत परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेची मुळ कारण काय, हाणामारी झालेल्या गटातील तरुण कोण आदींचा शोध पोलीसांनी सुरू केला असून, रात्रीच शोधमोहिम सुरू केली. या घटनेप्रकरणी पोलीसांतर्फे दोन्ही गटातील तरुणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.