Sat, Jul 20, 2019 21:48होमपेज › Aurangabad › कोणी केले पत्र्याचे कडे तर कोणी दंगेखोरांना हुसकावले

औरंगाबाद हिंसाचारातील ‘हिरो’ :जखमींच्या उपचारासाठी नर्सची रात्रभर धडपड

Published On: May 13 2018 10:41AM | Last Updated: May 13 2018 10:41AMऔरंगाबाद :

शुक्रवारी रात्री ते पहाटेपर्यंत सुरू असलेल्या दगडफेकीत राजाबाजारातील शेकडो तरुण, महिला व नागरिक जखमी झाले. या जखमींवर रात्रीपासून ते सकाळपर्यंत उपचार करत नर्स कल्याणी चव्हाण- सिद्धपुरा यांनी मोफत सेवा दिली. शहरातील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणार्‍या कल्याणी चव्हाण- सिद्धपुरा यांनी रात्रीपासून ते सकाळपर्यंत शंभर ते दीडशे जणांवर उपचार केले. रात्री  बारावाजेनंतर मोतीकारंजा-गांधीनगरात झालेल्या घटनेनंतर त्याचे पडसाद जुन्या शहरात उमटण्यास सुरुवात झाली. जिन्सी-नवाबपुरा व राजाबाजार या दोन्ही ठिकाणी तरुणांचे गट जमा होऊन रस्त्यावर  आले. 

सुरुवातीला नवाबपुरा-राजाबाजार येथील सायकलटायर विक्रीचे दुकान, तुळजाराम पतंग दुकान यांसह वाहनांना आग लावण्यात आली. त्यानंतर तरुणांच्या टोळक्यांकडून तुफान दगडफेक होत असल्याने,  या दगडफेकीत राजाबाजारातील शेकडो तरुण जखमी झाले. या तरुणांवर उपचारासाठी कल्याणी चव्हाण सरसावल्या. त्यांनी जखमींवर उपचार केल्याने दहशतीच्या परिस्थितीत जखमींना रुग्णालयात  नेण्याची धावपळ वाचली.  

ज्येष्ठ महिलेचे धाडस, दंगेखोरांना हुसकावले

दंगलीची सर्वाधिक झळ बसलेल्या राजाबाजारमधील ज्येष्ठ महिलेने घरात केवळ दोनच महिला सदस्य असताना दंगेखोरांना हुसकावून लावले. शुक्रवारी मध्यरात्री हा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेला  दिसत होता. चंदन हॉटेल, तुळशीराम पतंग मार्टसह अनेक दुकाने जळत होती. बेभान जमावाने आपला मोर्चा संस्थान गणपतीसमोरील आळीत वळविला. माजी नगरसेवक डॉ. चेनकरण संचेती यांच्या  घरावर हल्ला झाला. दंगेखोर थेट दुसर्‍या मजल्यावरील  घरात शिरले; पण 65 वर्षीय पुष्पा हंडा यांनी प्रचंड साहस दाखवित स्वत:सह आपल्या सुनेचे रक्षण केले. त्यांचा पवित्रा पाहून समाजकंटकांचा आक्रमक जमाव पुढे चालता झाला. 

तुपे यांनी केले पत्र्याचे कडे 

दंगलीची भीषणता वाढली व हे कुटुंब संकटात असल्याचे कळाल्यावर माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी राजाबाजार गाठत दंगेखोरांनी हल्ला केलेल्या घरातील पत्र्याचे कडे करत महिलांना सुरक्षित बाहेर काढले. परिसरात झालेला हल्ला नियोजनबद्ध होता, समाजकंटक तिखटाचे पाऊच, बाटल्या घेऊन तयारीने आले होते, पोलिसांची मदत उशिरा मिळाली, आग विझविणार्‍या बंबावर हल्ला करत  दंगेखोरांनी पिटाळले, असे नागरिकांनी दै. पुढारीला सांगितले.