Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Aurangabad › प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकर राजे..आठवलेंचे जोरदार प्रत्युत्तर

Published On: Jan 14 2018 2:45PM | Last Updated: Jan 14 2018 2:53PM

बुकमार्क करा
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

दलित समाजाच्या नेतृत्‍वावरून प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. काल, शनिवारी कोल्‍हापुरात प्रकाश आंबेडकरांनी मी दलित समाजाचा राजा होतो आणि राहणार आहे. माध्यमांनी जे पेपर्स टायगर्स तयार केले, ते तुमच्याकडेच राहू द्या, असा टोला आठवलेंना लगावला होता. त्याला आज रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. 

प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू म्हणून नक्कीच मोठे आहेत. मी छोटा माणूस आहे. मी कुणाला निवडून आणले नाही हे त्यांचे म्हणणेही खरे असेल. पण त्यांना निवडून आणण्यात माझाही वाटा होता हेही तितकेच सत्य आहे. ते स्वतःला राजा म्हणत असतील तर त्यावर माझा काही एक आक्षेप नाही. पण मी देखील सरदार आहे आणि सरदारांशिवाय राज्य चालविणे अशक्य असते, असेही आठवले म्हणाले. 

बॅकफूटवरून फ्रंटफूटवर कसे जायचे मला ठाऊक : आठवले

कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंदचे आवाहन केले. परंतु त्यांनी आवाहन केले म्हणून बंद झाला असे नाही. तो होणारच होता. शिवाय बंदमध्ये माझे कार्यकर्तेच आघाडीवर होते. मी बॅकफूट वर गेलो, असे म्हणणे चुकीचे आहे, बॅकफूटवरुन फ्रंटफूटवर कसे जायचे हे मला चांगले ठाऊक आहे, असा टोलाही आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना मारला. 

मंत्रीपद घालविण्यासाठी ऐक्य अमान्य

मी नेहमीच ऐक्याची भूमिका मांडणारा नेता आहे. पण एक दिवस एका मंचावर येऊन ऐक्य होणार नाही. त्यासाठी आधी ऐक्याचा फॉर्म्यूला तयार झाला पाहिजे. प्रकाश आंबेडकरांशिवाय हे ऐक्य शक्य नाही. ऐक्य होणार असेल तर दुय्यम स्थान स्वीकारण्याचीही आपली तयारी आहे. पण केवळ माझे मंत्रीपद घालविण्यासाठी ऐक्य होणार असेल किंवा तशी अट घातली जात असेल तर ते आपल्याला मान्य नाही, असेही आठवले म्हणाले.

वाचा संबंधित बातम्या

सोशल मीडियावर आंबेडकर विरुद्ध आठवले

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांचा धोकाः आंबेडकर

कोरेगाव भीमाच्या घटनेमागे मराठा संघटनांचा हात: रामदास आठवले 

दलितांचा राजा होतो; पुढेही राहीन : अ‍ॅड. आंबेडकर