Sun, Jun 16, 2019 03:06होमपेज › Aurangabad › पावसाने दाणादाण

पावसाने दाणादाण

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 03 2018 12:09AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहर व जिल्ह्यात शनिवारी सलग दुसर्‍या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तासभरात 30 मि.मी.पावसाची नोंद झाली. पावसाबरोबरच वाहणार्‍या वादळी वार्‍यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहानूरवाडीत झाड कोसळल्याने घरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाची मदत घ्यावी लागली. जयभवानीनगरातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. गारखेडा परिसरात विजेच्या उच्चदाबाची तार भररस्त्यात कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पावसामुळे शहरातील वातावरण आल्हाददायक बनले होते. 

शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी चार वाजेनंतर ढग दाटून आले व मुसळधार पावसास सुरुवात झाली. तब्बल तासभर मान्सूनपूर्व पाऊस मनसोक्‍त बरसला. या पावसाने महापालिकेच्या नालेसफाईचे तसेच महावितरणच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. ‘एमजीएम’मधील अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्रात 30 मि.मी. पावसाची नोंद झाली. 

वसाहतींत पाणी घुसले ः  पावसामुळे जयभवानीनगर अक्षरशः जलमय झाले होते. नालेसफाई न केल्याने अनेक घरांत पाणी शिरले. घरात शिरलेले पाणी बाहेर काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. गल्ली-बोळांत गुडघाभर पाणी साचले. 

गांधेली परिसरात गारपीट ः शहरात शनिवारी दुपारी अर्ध्या तासात सरासरी 30 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गांधेलीसह काही भागात गाराही पडल्याचे लोकांनी फोन करून सांगितले, अशी माहिती खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

शहर जलमय ः व्यंकटेश मंगल कार्यालयासमोरील इमारतीत पाणी शिरले. औषधी भवन, जयभवानीनगर येथील नाल्यांना पूर आल्याने नागरिकांच्या घरांत नाल्याचे घाण पाणी घुसले. फकीरवाडी, दलालवाडी, जयभवानीनगर येथील रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.  विद्युत कॉलनी, मुकुंदवाडी, सिडको एन-3, सिडको एन-4 येथे वादळी वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडली. शहानूरवाडी येथील शम्सनगर येथे झाड कोसळल्याने घरात अडकलेल्यांना अग्निशमनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. उकाड्यामुळे हैराण झालेल्या शहरवासीयांना या पावसाने दिलासा दिला. बच्चेकंपनीने दंगामस्ती करीत पावसाचा आनंद घेतला.