Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Aurangabad › साऊथ सिटीजवळ दीड तास ठिय्या

साऊथ सिटीजवळ दीड तास ठिय्या

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:38AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

शहरातील कचरा गोलवाडी येथे आणून टाकण्यास छावणी परिषदेने दिलेल्या परवानगीला शनिवारी संतप्त नागरिकांनी याला विरोध करून छावणी परिषदेची कचर्‍याची लोडिंग रिक्षा फोडली होती. तसेच मनपाच्या कचर्‍याच्या गाड्या वापस पिटाळून लावल्या होत्या. मात्र मनपा प्रशासनाच्या वतीने शनिवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा या ठिकाणी गुपचूपपणे कचर्‍याच्या अनेक गाड्या खाली करण्यात आल्या. रात्री नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिस बळाचा वापर करण्यात आला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रविवारी नगर रोडवर साऊथ सिटीजवळ रस्त्यावर उतरून जवळपास दीड तास ठिय्या आंदोलन केले.

शहरातील कचर्‍याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न मार्गी लागेपर्यंत छावणी परिषदेने छावणी परिषदेच्या गोलवाडी येथील कचरा डेपोत शहराचा कचरा आणून टाकण्यासाठी परवानगी दिली होती. शनिवारी सकाळी शहरातून भरून आलेल्या मनपाच्या कचर्‍याच्या काही गाड्या छावणी परिषदेच्या गोलवाडी येथील कचरा डेपोत खाली करण्यात आल्या होत्या. याची माहिती मिळताच दीड-दोनशे नागरिकांनी या ठिकाणी जमा होऊन या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध केला. तसेच छावणी परिषदेची कचर्‍याची लोडिंग रिक्षा फोडून कचर्‍याच्या भरून आलेल्या मनपाच्या गाड्यांना वापस पिटाळून लावले होते. शिवाय येथे     नागरिकांनी दिवसभर खडा पाहारा ठेवला होता. त्यानंतर मनपा प्रशासनाने खेळी खेळली. मध्यरात्री अचानक कचर्‍याच्या गाड्या भरून आणल्या आणि अनेक गाड्या तेथे खाली केल्या. या वेळी काही नागरिकांनी याला विरोधदेखील केला. मात्र प्रशासनाने पोलिस बळाचा वापर करून नागरिकांना रात्री तेथून हुसकावून लावले आणि येथे कचरा टाकण्यात आला. प्रशासनाच्या या दडपशाहीविरोधात रविवारी सकाळी तीसगाव, म्हाडा कॉलनी, गोलवाडी, भारतनगर येथील नागरिकांनी म्हाडा कॉलनीतील गणपती मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली. बैठकीत या भागात कुठल्याही प्रकारे कचरा टाकू न देण्याचा निर्णय घेऊन या प्रकरणी न्यायालयात याचिका सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार तसेच खासदार यांनी घेतलेल्या बघ्याच्या भूमिकेविषयी जोरदार टीका करण्यात आली. बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र कसुरे, तीसगावच्या सरपंच कौशल्याबाई कसुरे, माजी सरपंच संजय जाधव, माजी सरपंच अंजन साळवे, राजेश कसुरे, मोहन चौधरी, सुरेश फुलारे, राजेंद्र जैस्वाल, सुनील दिवेकर, अनिल जाधव, नितीन पानभिसरे, केशव सलामपुरे, योगेश कसुरे, अमरसिंग सूर्यवंशी, सागर कसुरे, भरत सलामपुरे, लखन सलामपुरे, विलास सलामपुरे, कमलेश सलामपुरे, लखन सलामपुरे, कल्पना वाघमारे, लता बन, सुजाता गाडेकर, नंना आळंजकर, जया नेमाने, वैशाली हिवाळे, ज्योती सानप, सीमा पवार, कल्पना तायडे, सीमा कसुरे आदींसह महिलांची मोठी संख्या होती. 

आमदारांना अडविले, खासदार फिरकलेच नाहीत
खासदार चंद्रकांत खैरे हे रविवारी दुपारी एएस क्लब मार्गे एका कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. त्यांना घेराव घालून या प्रकरणी जाब विचारण्यासाठी औरंगाबाद-नगर महामार्गावरील साऊथ सिटीजवळ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शेकडो नागरिक जमा झाले होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास आ. अतुल सावे हे या ठिकाणावरून जात असताना नागरिकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी सावे यांनी कचर्‍यासंदर्भात सोमवारी बैठक घेण्यात येणार असून या भागात कचरा डेपो होणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यापाठोपाठ आलेल्या उपमहापौर औताडे यांचीदेखील गाडी अडवून नागरिकांनी त्यांना घेराव घातला. खा. खैरे हे या मार्गावरून जाणार नसल्याचे समजल्यावर दुपारी दोन वाजता या ठिकाणी जमा झालेला जमाव पांगला. दरम्यान सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंढे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, मुकुंद देशमुख, सतीश टाक, वाहतूक शाखेचे मनोज पगारे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.