Mon, Apr 22, 2019 12:02होमपेज › Aurangabad › कर्मचार्‍यांनी जाळल्या कचर्‍याच्या गाड्या

कर्मचार्‍यांनी जाळल्या कचर्‍याच्या गाड्या

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 1:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दोन आठवड्यांपूर्वी प्रचंड जाळपोळ आणि दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मिटमिटा येथील तीनशेहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. मात्र कचर्‍याच्या गाड्यांना मनपा कर्मचार्‍यांनीच आग लावल्याचा गंभीर आरोप नगरसेवक रावसाहेब आमले यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत केला. पुरावे म्हणून त्यांनी काही छायाचित्रे आणि चित्रफीतही सादर केली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. 

महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली मनपाची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत सुरुवातीलाच कचराकोंडीचा मुद्दा उपस्थित झाला. मिटमिटा वॉर्डाचे नगरसेवक रावसाहेब आमले यांनी काही छायाचित्रे दाखवीत जाळपोळीच्या घटनेला मनपाचे अधिकारी, कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. मनपाचे अधिकारी, कर्मचारी 7 मार्च रोजी शहरातून कचर्‍याच्या गाड्या घेऊन मिटमिटाकडे आले. त्यांना हा कचरा सफारी पार्कच्या जवळ गट नंबर 54 मध्ये टाकायचा होता. त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यानंतर पोलिसांनी घरांमध्ये घुसून तेथील महिला, पुरुष, वयोवृद्धांना अतिशय अमानुष पद्धतीने मारहाण केली. नंतर या प्रकरणात मनपाची कचर्‍याची वाहने जाळल्याप्रकरणी तेथील नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मनपाच्या कर्मचार्‍यांनीच ही वाहने जाळली. त्याचे आपल्याकडे पुरावेही आहेत, असे म्हणत आमले यांनी त्यांच्याकडील काही छायाचित्रे महापौरांकडे सादर केली. ही वाहने मनपा कर्मचार्‍यांनी जाळली, पण त्यामागे अधिकार्‍यांचाही हात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना कोणी आदेश दिले याचीही चौकशी व्हावी अशी मागणी आमले यांनी केली. यावेळी महापौर आणि प्रभारी मनपा आयुक्‍त नवल किशोर राम यांनी आमले यांनी दिलेली छायाचित्रे पाहून काही वेळ चर्चा केली. चर्चेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणी तीन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.