Tue, Jul 23, 2019 10:45होमपेज › Aurangabad › कारला हात लावला म्हणून प्राध्यापिकेची विद्यार्थिनीस मारहाण

कारला हात लावला म्हणून प्राध्यापिकेची विद्यार्थिनीस मारहाण

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 08 2018 2:05AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

पायर्‍यांवर बसलेल्या शाळेतील विद्यार्थिनीवर कारला हात लावल्याचा आरोप करत प्राध्यापिकेने बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी मॉडर्न हायस्कूल येथे घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात प्राध्यापिकेविरुध्द तक्रार दिली आहे. फरत असे (नवखंडा महाविद्यालय) प्राध्यापिकेचे नाव आहे.

याबाबत मिर्झा राशिद बेग रा. मंजूरपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेग यांची मुलगी जरिन सिमरन बेग (वय 11) ही ज्युबली पार्क येथील मॉडर्न हायस्कूल या शाळेत इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत आहे. सोमवारी दुपारी सव्वाएक वाजेच्या सुमारास ती शाळेतील मैदानातील पायर्‍यांवर रिक्षाची वाट पाहात बसली होती. या मैदानातच कार (एमएच 20 डीजे 6596) उभी होती. काही विद्यार्थ्यांचा चुकून या कारला हात लागला आणि सायरन वाजायला सुरुवात झाली. यावेळी फरत अचानक कारजवळ आल्या. त्यांनी कोणताही विचार न करताच जरिनवर, गाडीला हात लावत असल्याचा आरोप करत तिचे केस धरून मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच  जरिनला शाळेच्या मुख्याध्यापिका शेख कौसर यांच्या केबनमध्ये ओढत नेले. तेथे तिची तक्रार करताना आणखी मारहाण केली. त्यामुळे जरिनचे तोंड सुजले होते. हा प्रकार जरिनचे वडील राशिद बेग यांना समजताच त्यांनी शाळेत धाव घेतली. तसेच शाळेत लावलेले कॅमेरे तपासले असता त्यात प्रा. फरत विनाकारण मुलीस मारहाण करत असल्याचे दिसले. त्यांनी फरत यांना जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे बेग यांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिस हवालदार गवळी हे चौकशी करीत आहेत.

कारवाई करणार ः

मॉडर्न शाळेतील विद्यार्थिनीस आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेने मारहाण केल्याचे कळाले. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर कारवाई करणार असल्याचे रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन्सचे  प्राचार्य मकदुम फारुकी यांनी सांगितले.

शाळेच्या पार्किंगची तक्रार ः

मॉडर्न हायस्कूल शाळेच्या पार्किंगमध्ये शाळेशी संबंध नसणारे वाहनधारक चारचाकी व दुचाकी लावतात. याबाबत निसार यारखान यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे 28 जून रोजी तक्रार केली होती. त्यावर शिक्षणाधिकारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे.