Sun, Nov 18, 2018 07:43होमपेज › Aurangabad › गुजरातमध्ये गर्भलिंग निदान, भालगावात गर्भपात

गुजरातमध्ये गर्भलिंग निदान, भालगावात गर्भपात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्याचा तपास करताना अनधिकृत गर्भपात अड्डा शोधून काढणार्‍या पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी (दि. 26) हा अड्डा चालविणार्‍या महिलेला अखेर जेरबंद केले. तसेच, पीडित विवाहितेचा पती आणि नंदई यांनाही अटक केली. गुजरातमध्ये विवाहितेचे गर्भलिंग निदान केल्यांनतर त्यांनी आपत भालगावात तिचा बळजबरी गर्भपात केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

ललिता रमेश मून ऊर्फ खाडे (40, रा. आपत भालगाव) असे अवैध गर्भपात अड्डा चालविणार्‍या महिलेचे नाव असून सुनील शिवाजी वाघ (पीडितेचा पती) आणि बापू काशीनाथ डिघुळे (नंदई, दोघे रा. वडगाव सलामपुरे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड यांनी दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहितेला सासरचे लोक छळत होते. प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये का आणत नाही म्हणून पती सुनील वाघ, सासू, सासरा, दीर, नणंद, नंदई छळत असल्याचा गुन्हा एप्रिल 2016 मध्ये पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक अशोक आव्हाड यांच्याकडे आहे.

दरम्यान, सासरच्या लोकांनी बळजबरी गर्भपात केल्याची तक्रार विवाहितेने केली. याचा तपास करताना पुंडलिकनगर पोलिसांनी बीड रोडवरील आपत भालगाव येथे छापा मारला. तेथे दोन मजली इमारतीवर कापड दुकानाचा बोर्ड लावलेला आढळला. तसेच, आत अवैध गर्भपात केंद्र सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्याच ठिकाणी आरोपी ललिता मून ऊर्फ खाडे पोलिसांना आढळली.

दरम्यान, डॉक्टरांच्या मदतीने छापा मारल्यामुळे अवैध गर्भपात केंद्रातील साठा जप्त करणे, डॉक्टरांचे जबाब नोंदविणे याला उशीर झाला. रात्री महिलेला अटक करता येत नसल्यामुळे ललिता मून हिला दुसर्‍या दिवशी हजर राहण्याची नोटीस बजावून सोडून दिले होते, परंतु त्यानंतर हजर होण्याऐवजी ललिता गायब झाली. शनिवारी दिवसभर पुंडलिकनगर पोलिसांनी तिचा शोध घेतला, पण ती काही मिळून आली नाही, दरम्यान ललिता मून ऊर्फ खाडे पसार झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले होते.