Sat, Nov 17, 2018 08:17होमपेज › Aurangabad › ‘त्यांना’ ट्रिपल तलाकसाठी निवडून दिले नव्हते

‘त्यांना’ ट्रिपल तलाकसाठी निवडून दिले नव्हते

Published On: Feb 09 2018 2:17AM | Last Updated: Feb 09 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रामजन्मभूमीसाठी संसदेत कायदा बनविणे हाच एकमेव पर्याय असून भाजपला जनतेने राममंदिर बनविण्यासाठीच निवडून दिलेले आहे. ट्रिपल तलाकचा कायदा बनविण्यासाठी नव्हे. ‘जीएसटी‘साठी अर्ध्या रात्री संसद बोलाविली जाते, मग राममंदिरासाठी का नाही? असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले. 

विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तोगडिया शहरात आले आहेत. दैनिक पुढारीने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, सत्तेत येऊन भाजपाला साडेतीन वर्षे झाली आहेत. तरीही राममंदिराचा प्रश्‍न सोडविता आलेला नाही. हा प्रश्‍न फक्त संसदेत कायदा करूनच सोडविता येतो, अशी माझी ठाम भूमिका आहे. लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत नाही. दोन्ही सभागृहांचे संयुक्त सत्र बोलावून राममंदिराचा कायदा पारित करून घ्यावा. राममंदिर बनवावे, मात्र शेजारी मशीद बनवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आगामी काळात भाजपच सत्तेत हवी 2019 साली होणार्‍या निवडणुकीत पुन्हा भाजप सरकार सत्तेत येईल का? तसेच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का असा प्रश्‍न प्रवीण तोगडिया यांना विचारला असता ते म्हणाले, की, भाजपचीच सत्ता देशात हवी. तेच मंदिर बनवतील. मोदी पंतप्रधान होतील का या प्रश्‍नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.