Wed, Jun 26, 2019 17:32होमपेज › Aurangabad › ‘पोस्टर बॉईज्’ रडारवर

‘पोस्टर बॉईज्’ रडारवर

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:36AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लावलेले बॅनर फाडल्यामुळे गुरुवारी (दि. 22) काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. शहरात तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार पोलिसांनी व्यवस्थित हाताळल्यामुळे सुदैवाने परिस्थिती नियंत्रणात राहिली, परंतु आता पोलिसांनी अवैध बॅनरबाजी करणार्‍यांवर कारवाईची मोहीम उघडली असून एक पथक सोमवारपासून मनपा अधिकार्‍यांना सोबत घेऊन कारवाई करेल, अशी माहिती पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे ‘पोस्टर बॉईज्’ पुन्हा रडारवर आले आहेत. 

याबाबत पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव म्हणाले की, विजयनगर चौकात बॅनर फाडल्याची घटना ही आपसातील वादातून झाली. तिन्ही आरोपींना तत्काळ अटक केली आहे. दरम्यान, बॅनरमुळे तणाव निर्माण झाला असल्याने यापुढे अवैध बॅनर लावणार्‍यांविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात येणार आहे. मनपा आयुक्‍तांना पत्र पाठवून अवैध बॅनर कोणते? याची माहिती घेतली जाईल. तसेच, मनपाच्या एका अधिकार्‍याला सोबत घेऊन उपनिरीक्षक हेमंत तोडकर यांचे पथक सोमवारपासून कारवाई करेल. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची वेळ पडल्यास मनपाचे अधिकारी फिर्याद देतील.

वसतिगृहचालकांना देणार नोटीस
शहरात अनेक ठिकाणी खासगी वसतिगृह चालविले जातात. त्यांना कोणत्या विभागाने परवानगी दिलेली आहे. त्यांच्याकडे परवानगी आहे का? याची तपासणी करण्यात येईल. तसेच, सर्वांना नोटीस देऊन विद्यार्थ्यांवर काबू ठेवण्याच्या सूचना देण्यात येतील. कारण; वसतिगृहातील विद्यार्थीच रस्त्यावर येऊन दगडफेक, घोषणाबाजी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी कळविले. 

तिन्ही आरोपी हर्सूल कारागृहात 
बॅनर फाडून शहरात तणाव निर्माण केल्याप्रकरणी कपिल जोगदंड, कुणाल वैष्णव आणि किशोर ठोंबरे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. पुंडलिकनगर ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही. बी. कापसे यांनी त्यांना अटक केली. दरम्यान, तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता सर्वांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली. तिन्ही आरोपी गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गल्लीतील अनेकांशी त्यांचा वाद असल्याचे चौकशीत समोर आल्याचे पोलिस उपनिरीक्षक कापसे यांनी सांगितले. 

आरोपींचे तडीपार गुंडासोबत बॅनर
कपिल जोगदंड, किशोर ठोंबरे या आरोपींचे तडीपार गुंडासोबत बॅनर असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. गुन्हेगारी स्वरूपाच्या या लोकांमुळे शहरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे यापुढे अवैध बॅनरबाजी करणार्‍यांविरुद्ध कडक मोहीम राबवू, असे पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी सांगितले.