Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Aurangabad › ‘पद्मावत’साठी पोलिस सज्ज

‘पद्मावत’साठी पोलिस सज्ज

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:47AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी करीत राजपूत करणी सेना रस्त्यावर येण्याची शक्यता वाढल्याने पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला. 11 सिनेमागृहांत प्रत्येकी दोन अधिकारी आणि 50 कर्मचारी बंदोबस्तावर राहणार असून बाराशे पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दल, स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी पथके सज्ज आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी दिली. 

25 जानेवारी रोजी पद्मावत सिनेमा प्रदर्शित होत आहे. औरंगाबादेतील 11 सिनेमागृहांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून राजपूत करणी सेनेने या सिनेमाला विरोध जाहीर केला आहे. तसेच, सिनेमा शहरात प्रदर्शित होऊ देऊ नका, अशी मागणी केली. दरम्यान, बुधवारी देशभरात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आंदोलन, जाळपोळ करण्यात आली. औरंगाबादेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे, विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे यांच्यासह सर्व सहायक पोलिस आयुक्‍त, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक बंदोबस्तावर राहणार असून एका सिनेमागृहात दोन अधिकारी आणि 20 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाची एक कंपनी, क्यूआरटी, स्ट्रायकिंग फोर्स बंदोबस्तावर राहणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे 
यांनी दिली. 

ऑल आऊट ऑपरेशन 
गुरुवारी (दि. 25) प्रदर्शित होणार्‍या पद्मावत सिनेमाच्या पार्श्‍वभूमीवर करणी सेनेच्या पदाधिकार्‍यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच, बुधवारी सायंकाळी राबविण्यात आलेले ऑल आऊट ऑपरेशन हा एक प्रतिबंधात्मक कारवाईचाच भाग असल्याचे डॉ. धाटे म्हणाल्या. 

प्रेक्षकांतही पोलिस
सिनेमागृहाच्या बाहेर तसेच आत कुठलाही गोंधळ होऊ नये, यासाठी काही पोलिस साध्या वेशात प्रेक्षकांमध्येही बसणार आहेत. त्यामुळे पोलिसांची सर्वांच्या बारीक-सारीक हालचालींवर विशेष नजर असेल. प्रेक्षकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी केले.