Sun, Mar 24, 2019 04:57होमपेज › Aurangabad › वरिष्ठांची अडविली कार पोलिसाला मिळाले १ हजार

वरिष्ठांची अडविली कार; पोलिसाला मिळाले १ हजार

Published On: Dec 24 2017 12:52PM | Last Updated: Dec 24 2017 11:37AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

रुग्णवाहिकेला वाट करून  देण्यासाठी वाहतूक शाखेच्या एका पोलिस कर्मचार्‍याने चक्‍क पोलिस उपायुक्‍तांचीच कार अडवून थांबवून ठेवली. कर्मचार्‍याची ही भूमिका पाहून काही क्षण पोलिस उपायुक्‍त तर गोंधळून  गेलेच, पण तेथील पोलिस कर्मचार्‍यांनाही ‘आता याच्यावर कारवाई होते’ असे वाटले; परंतु कार अडविल्यामुळे कारवाई होण्याऐवजी या वाहतूक पोलिसाला चक्‍क उपायुक्‍तांकडून एक हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. कारण  वाहतूक पोलिसाने उपायुक्‍तांची कार अडविली होती ती तिकडून रुग्ण घेऊन येणार्‍या अ‍ॅम्ब्यूलन्सला वाट मोकळी करून देण्यासाठी!

ही घटना सकाळी जालना रोडवर  विमानतळासमोर घडली. शनिवारी शहरात माजी पंतप्रधान  डॉ. मनमोहनसिंग, शरद पवार यांचा दौरा होता. त्याच्या बंदोबस्ताची सकाळपासूनच पोलिस तयारी करीत  होते. विमानतळासमोर बंदोबस्त होता. तेथे वाहतूक शाखेचे सहायक फौजदार  काकासाहेब कुबेर हे सुद्धा ड्यूटीवर होते. सकाळी दहाच्या सुमारास पोलिस उपायुक्‍त विनायक ढाकणे चिकलठाणा विमानतळाकडे आले.ढाकणे यांच्या  ताफ्याने विमानतळाकडे वळण घेताच तेथे तैनात असलेले वाहतूक शाखेचे सहायक फौजदार कुबेर यांनी हात दाखवून ढाकणे यांचे वाहन रोखले. कार अडविल्याचे पाहून उपायुक्‍त ढाकणे कारमधून खाली उतरले. तेव्हा त्यांना चिकलठाण्याच्या दिशेने अ‍ॅम्ब्यूलन्स येताना दिसली.

या  रुग्णवाहिकेला आधी जाता यावे यासाठी  कुबेर यांनी आपल्याला रोखले, हे लक्षात  येताच उपायुक्‍त पुन्हा कारमध्ये बसले. विमानतळावर  कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होती. तेवढ्यात त्या ठिकाणाहून जाणार्‍या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देत असताना कुबेर यांनी माझी गाडी अडवली. त्यांचे प्रामाणिक कर्तव्य भावल्याने त्यांचा सत्कार केला. कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया  डीसीपी विनायक ढाकणे यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली.