Fri, Apr 19, 2019 08:09होमपेज › Aurangabad › म्हणे..चलते पंछी के पैर उडाएंगे; सुपारी किलरच्या सुटकेचा कट उधळला

म्हणे..चलते पंछी के पैर उडाएंगे; सुपारी किलरच्या सुटकेचा कट उधळला

Published On: Aug 28 2018 8:02AM | Last Updated: Aug 28 2018 8:02AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचा मारेकरी तथा कुख्यात ‘सुपारी किलर’ इम्रान मेहंदी ऊर्फ दिलावर शेख नसीर आणि त्याच्या टोळीला सुनावणीसाठी न्यायालयात आणत असताना वाटेतच पोलिस पथकावर हल्ला करून त्यांना ‘हायजॅक’ करण्याचा फिल्मी स्टाईल प्लॅन सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने उधळून लावला.

या कामासाठी मध्य प्रदेशातून खास सात शार्प शूटरही आणण्यात आले होते. दिल्लीगेट ते चिकलठाणा एमआयडीसीतील नारेगाव चौकापर्यंत पाठलाग करून पोलिसांनी मध्य प्रदेशातील सात शार्प शूटरसह स्थानिक चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून एक पिस्तूल (7.65 एमएम), आठ जिवंत काडतुसे, फायर केलेले एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही थरारक कारवाई करण्यात आली. एक आरोपी पिस्तुलासह पसार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचीही शोधमोहीम सुरू केली आहे.

सुपारी किलर इम्रान मेहंदीवर पाच खुनांचा आरोप आहे. सोमवारी त्याला माजी नगरसेवक सलीम कुरेशी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 29 ऑगस्ट रोजी आणखी एका प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सुपारी घेऊन जिवंत गाडून हत्या करण्याचा त्याने सपाटा लावला होता. दरम्यान, सोमवारी त्याच्यासह टोळीला हर्सूल कारागृहातून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार होते. दरम्यान, वर्षभरापूर्वी जामिनावर सुटलेले आरोपी हबीब खालेद हबीब मोहंमद ऊर्फ खालेद चाऊस (35, रा. टाइम्स कॉलनी), मोहंमद शोएब मोहंमद सादेक (28, रा. जाहेदनगर) यांनी इम्रान मेहंदी आणि टोळीला हायजॅक करण्याचा प्लॅन आखला होता. या प्लॅनची माहिती कारागृहातील इम्रान मेहंदी यालाही होती. त्यासाठी त्यांनी इंदूर (मध्य प्रदेशातून) येथून सात शार्प शूटर मागविले होते. इम्रान
मेहंदीला न्यायालयात नेताना पोलिसांवर हल्ला करून ते या टोळीला पळवून नेणार होते. तत्पूर्वी, ही माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. आठ दिवसांपासून पोलिस या टोळीच्या मागावर होते. सोमवारी सकाळी शस्त्रास्त्राने सज्ज गुन्हे शाखा पोलिस या मोहिमेवर निघाले. पोलिसांवर हल्ला करून इम्रान मेहंदीला हायजॅक करण्याचा कट शिजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे मध्य प्रदेशच्या शार्प शूटरने हर्सूल जेलची रेकी केली होती. तसेच, जेलच्या पाठीमागे पिस्तुलातून फायरिंगची प्रॅक्टिसही केली होती. तसेच, शार्प शूटर हे ‘ऐसे बंदे हैं, चलते पंछी के पैर उडाएंगे’, तसेच अंधा तीर है, छोडेंगे तब बराबर निशाने पर लगेगा, असे असल्याची माहिती होती. त्यामुळे पोलिसांनीही पूर्ण तयारी केली होती. सर्व शस्त्रे लोडेड होती. वेळप्रसंगी गोळीबार करण्याचीही पोलिसांनी तयारी ठेवली होती. विशेष म्हणजे, हा सर्व कट इम्रान मेहंदी आणि त्याच्या टोळीनेच रचल्याचा पोलिसांचा दावा आहे.


सशस्त्र पोलिसांनी फत्ते केली मोहीम

सकाळी साडेसात वाजता दिल्लीगेट येथे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार अनिल वाघ, अमोल देशमुख हे चहा पित होते. तेथे मध्य प्रदेशातील इंदूर पासिंगची एक तवेरा गाडी दिसली. पोलिसांनी तिचा क्रमांक घेऊन सर्व ठिकाणी दिला. त्यानंतर वाहनाचा पाठलाग केला. ती गाडी हुलकावणी देऊन नारेगावात गेली. ही माहिती मिळताच पोलिसांनी नारेगाव परिसर पिंजून काढला. त्यात एका गल्लीतील कोपर्‍यात तवेरा आढळून आली. एक स्थानिक आरोपी देशी दारूची बाटली घेऊन जाताना दिसला. त्यानंतर दुचाकीवर दोघे बाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ तवेरा निघाली. त्यामुळे गरवारे चौकाजवळ दोन्ही ठिकाणची वाहतूक रोखून धरण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या. तोपर्यंत दुचाकीवरील आरोपी तेथे आले. तेथे दुचाकीपाठोपाठ आलेल्या पोलिस अधिकारी घनश्याम सोनवणे, अमोल देशमुख यांनी दुचाकीवरील एकाला झडप मारून पकडले. त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. तोपर्यंत पाठीमागील तवेरा गाडी तेथे आली होती. ठरल्याप्रमाणे पाठीमागून रस्ता पोलिसांनी बंद केला होता. तवेरा पोलिसांजवळ आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी फिल्मीस्टाइल पिस्तूल रोखून तवेराला थांबविले. याचवेळी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक अनिल वाघ आणि कर्मचार्‍यांनी आपापले पिस्तूल रोखून गाडीतील सर्वांना हँड्सअपच्या सूचना केल्या. त्यामुळे आरोपी शरण आले. पोलिसांनी गाडीतून एक पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई उपायुक्‍त निकेश खाटमोडे, डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्‍त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

11 आरोपी अटकेत : इम्रानच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे आरोपी- मोहंमद शोएब मोहंमद सादेक (28, रा. जाहेदनगर), शेख यासेर शेख कादर (23, रा. कौसर पार्क, नारेगाव), सय्यद फैजल सय्यद एजाज (18, रा. किलेअर्क) आणि मोहंमद नासेर मोहंमद फारूक (24, रा. चंपा चौक, नॅशनल हॉटेलसमोर) हे पाच आरोपी स्थानिकचे आहेत. त्यांच्यासोबत मध्य प्रदेशचे नफीसखान मकसूदखान (40, रा. गोगावा), नकीबखान रयाज मोहंमद (55, रा. निमराणी,) फरीदखान मन्सूरखान (35, रा. अकबपूर फाटा), सरुफखान शकूरखान (45, रा. ग्राम महाराज खेडी), शब्बीरखान समदखान (32, रा. रजानगर -धरमपुरी), फैजूल्ला गनी खान (37, रा. खडकवाणी), शाकीरखान कुर्बानखान (40, रा. बालखड, सरवाना, जि. खारगोन, मध्य प्रदेश).

हर्सूल जेलची रेकी, पाठीमागे पिस्तूलची टेस्ट

इम्रान मेहंदीला पोलिसांच्या  वडीतून सुटका करून पळवून नेण्याचा कट रचणार्‍या मध्य प्रदेशातील आरोपींनी हर्सूल जेलची रेकी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून जप्त केलेल्या पिस्तूलची 23 ऑगस्ट रोजी हर्सूल जेलच्या पाठीमागे टेस्ट घेण्यात आली होती. त्यावेळी तीन राउंड फायर केले होते. त्यातील एका राउंडच्या पुंगळ्या पोलिसांना सापडल्या आहेत. या आरोपींनी कटाबाबत बोलण्यासाठी थेट जेलमध्ये जाऊन इम्रान मेहंदीची भेट घेतली होती, असेही पोलिसांनी सांगितले. वर्षभरापूर्वी जामिनावर सुटलेल्या आरोपींनी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

इम्रान मेहंदीसह आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा

माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांचे अपहरण करून निर्घृण खून करत पुरावा नष्ट करणार्‍या इम्रान मेहंदीसह आठ जणांना मोक्‍काचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्येकाला 15 लाख 11 हजार रुपये, असा 1 कोटी 20 लाख 88 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या प्रकरणी इम्रान मेहंदी, सय्यद नाजेर, शेख इम्रान ऊर्फ सुलतान, सय्यद जहीर ऊर्फ शेरा, नुमान खान, जुबेर खान, हबीब खालेद, फरीद खान फेरोज खान या आठ जणांना खून, अपहरण, पुरावा नष्ट करणे या कलमांखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सबळ पुराव्याअभावी महंमद शोएब, शेख हसन आणि महंमद अश्फाक या तिघांची निर्दोष मुक्‍तता करण्यात आली.