होमपेज › Aurangabad › मनपाचे विषप्रयोग

मनपाचे विषप्रयोग

Published On: Apr 13 2018 1:53AM | Last Updated: Apr 13 2018 1:50AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावताना मनपा प्रशासन अनेक ठिकाणी थेट नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी जागा मिळेल तिथे गुपचूप पद्धतीने कचरा जमिनीत पुरत आहेत. आरतीनगर मिसारवाडी वॉर्डात तर पालिकेने चक्‍क कचरा टाकून एक जुनी विहीरच बुजविली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कचर्‍यातील पाणी झिरपून या भागातील भूजल प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरात दोन महिन्यांपासून कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. जुना कचरा डेपो बंद झाल्याने शहरातील कचरा कुठे टाकायचा असा प्रश्‍न पालिकेपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे शासनाने यापुढे कचरा साठवून न ठेवता त्यावर प्रक्रियाच करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. पालिकेनेही न्यायालयात शपथपत्र देऊन कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीनेच विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा केला आहे, परंतु प्रत्यक्षात पालिकेकडून जमिनीखाली कचरा पुरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. आरतीनगर मिसारवाडी वॉर्डात तर मनपाच्या कर्मचार्‍यांनी कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी विहिरीचा वापर केला आहे. पिसादेवी रोडवर असलेल्या एका जुन्या विहिरीत तब्बल महिनाभर कचरा टाकण्यात आला. त्यामुळे आता ही विहीर पूर्णपणे बुजली आहे. आता या कचर्‍यावर माती टाकण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात कचर्‍यातील पाणी खाली झिरपून ते विहिरीतील झर्‍यांद्वारे जमिनीत जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या भागातील पाणी प्रदूषित होणार आहे.

जमिनीतील पाण्यावरच भागते तहानआरतीनगर मिसारवाडी भागात मनपाची नळ योजना आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना तेथील विहिरी, बोअरवेल, हातपंप याद्वारेच आपली तहान भागवावी लागते. कचर्‍यामुळे भूजल प्रदूषित झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

Tags : Aurangabad,  poisoning,  Municipal