Tue, Mar 19, 2019 09:57होमपेज › Aurangabad › ‘त्या’ पंपावर गेलेच नाही पथक

‘त्या’ पंपावर गेलेच नाही पथक

Published On: Jan 25 2018 1:03AM | Last Updated: Jan 25 2018 12:45AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिवाजीनगरातील आयओसी कंपनीच्या पंपावर माप मारले जात असल्याची तक्रार मंगळवारी एका ग्राहकाने केली होती, या घटनेमुळे नागरिकांची गर्दी झाल्याने तास-दोन तास पंप बंद ठेवावा लागला होता. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकांनी शहरातील काही पंपांची तपासणी केली, तपासणीची सुरवातच पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिवांच्या पंपापासून करण्यात आली. विशेष म्हणजे, तक्रार समोर आलेल्या शिवाजीनगरातील ‘त्या’ पंपावर मात्र पथक फिरकलेच नाही. 

शिवाजीनगरातील आयओसी पंपावर एका ग्राहकाने मंगळवारी पेट्रोल भरले, त्याला कमी पेट्रोल दिल्याचा संशय आल्याने, मोजून देण्याची मागणी केली होती. या प्रकारामुळे पंपावर नागरिकांची एकच गर्दी झाली होती. या घटनेनंतर बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी दोन पथके नेमून शहरातील क्रांती चौकातील हिंद, चुन्नीलाल आणि बाबा पेट्रोलपंप, तसेच दुसर्‍या पथकाने जालना रोडवरील राज पेट्रोलपंप, हर्सूल टी पॉइंट येथील एचपीसी कंपनीचा पंप, एमजीएम जवळील अंबरवाडीकर पंपाची तपासणी केली. राज पेट्रोल पंप हा पेट्रोलिय डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदनमल खिंवसरा यांचा आहे. हिंद पेट्रोलपंप हा असोसिएशनचे सचिव अकिल अब्बास, बाबा पेट्रोलपंप हा असोसिएशनचे उपाध्यक्ष बुर्जिन प्रिंटर यांचा आहे.
पथकात डॉ. कदम यांच्यासह वजन व मापे विभागाचे निरीक्षक संतोष अंधोरीकर, तहसीलदार अनिता भालेराव, मनीषा मेने, दत्ता निलावाड, एम. बी. वाणी, संतोष अनर्थे, सुधाकर मोरे, बबन आवळे, शेखर शिंदे, ऊर्मिला घनमोडे, शेख आसिफ यांचा समावेश होता.

शिवाजीनगरातील पंपाबाबत ग्राहकाने कंपनीच्या विक्री अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. विक्री अधिकारी तसेच वजन व मापे विभागाच्या निरीक्षकांनी कालच पंपावर जाऊन तपासणी केली. तिथे काही गैरप्रकार आढळून आले नाही. त्यामुळे आजच्या तपासणीत आम्ही शहरातील इतर पंपांची तपासणी केली.

- डॉ. भारत कदम,
जिल्हा पुरवठा अधिकारी.

तपासणी आणि निष्कर्ष...
तपासणीअंती कुठेही अनुचित प्रकार न आढळल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. पेट्रोलमधील इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आल्यास इथेनॉलचे रूपांतर पाण्यात होते. त्यामुळे इंधनाच्या टाकीत पाणी जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असून, त्याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मत व्यक्‍त करण्यात आले.