Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Aurangabad › तिसरे अपत्य लपवून दाम्पत्याने उचलला पगार

तिसरे अपत्य लपवून दाम्पत्याने उचलला पगार

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 1:02AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

तिसर्‍या अपत्याची माहिती लपवत पगार उचलून कैसर कॉलनीतील अलमुबीन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेसह तेथेच लिपिक असलेल्या तिच्या पतीने शासनाची फसवणूक केली. हा प्रकार 2016 सालापासून सुरू आहे. या प्रकरणी संस्थेचे दोन संचालक, मुख्याध्यापिकेसह चौघांविरुद्ध जिन्सी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्याध्यापिका काझी नुरजहाँ बेगम (30), तिचा पती लिपिक शेख मोबीन शेख शाहेब (35), संचालक सय्यद अजगिरी बेगम मोहंमद अली (45) आणि शेख मोहसीन शेख शोहेब (52) अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सामाजिक कार्यकर्ते शेख अक्रम शेख अथर (27, रा. रहेमानिया कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कैसर कॉलनीत अलमुबीन शिक्षण संस्था संचलित अलमुबीन प्राथमिक शाळा आहे. तेथे काझी नूरजहा ही 2007 पासून नोकरीला असून 2012-2013 पासून ती मुख्याध्यापिका आहे. तिचा पतीही याच शाळेत लिपिक आहे. 18 जुलै 2016 रोजी त्यांनी तिसर्‍या अपत्याला जन्म दिला. शासकीय नियमानुसार 2005 सालानंतर जर तिसरे अपत्य जन्मलेले असेल तर त्यांना शासकीय सेवेचे लाभ घेता येत नाहीत. तसेच, असे लाभ घेणे म्हणजे शासनाची फसवणूक ठरते. दरम्यान, ही माहिती असताना मुख्याध्यापिका काझी नूरजहा आणि तिचा पती लिपिक शेख मोबीन हे तेव्हापासून पगार उचलत आहेत.

तिसर्‍या अपत्यासाठी घेतली प्रसूती रजा

मुख्याध्यापिका काझी नूरजहा बेगम हिने तिसर्‍या अपत्यासाठी चक्‍क प्रसूती रजाही घेतली होती. विशेष म्हणजे, त्याचा लाभही तिने मिळविला असून यात शासनाची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.