Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Aurangabad › पेट्रोलसाठी नागरिकांचे ‘पाणी पाणी’

पेट्रोलसाठी नागरिकांचे ‘पाणी पाणी’

Published On: Feb 03 2018 2:26AM | Last Updated: Feb 03 2018 1:37AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

इथेनॉलमिश्रित पेट्रोलचे पाणी होते. त्यामुळे पंपचालक आणि वाहनधारकांमध्ये वाद होत आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून काहीच सहकार्य होत नसल्याच्या निषेधार्थ शहरातील पंपचालकांनी सायंकाळी सात ते सकाळी 7 पर्यंत पंप बंद ठेवण्याचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पेट्रोल संपल्यानंतर वाहन ढकलत घरी नेताना नागरिकांचा घाम निघत आहे. सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारीही पंपचालकांनी बंद पाळला. या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन मात्र, या प्रकरणात बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. 

पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिळवले जाते. ही प्रक्रिया कंपनीच्या ऑइल डेपोवरच होते. पंपचालकांना डेपोवरून पेट्रोल दिले जाते. ते पेट्रोल पंपचालक पंपावर आणून विक्री करतात. गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या इंधन टाकीत पाणी निघत असल्याच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्यामुळे वाहनधारक आणि पंपचालक यांच्यात वाद होत आहेत. परिणामी, पंपचालकांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा वाद वाढल्याने पोलिसांनाही पाचारण करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे इथेनॉलबाबत कंपन्यांनी जनजागृती करावी, अशी मागणी पंपचालकांकडून होत आहे. मात्र कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याविरोधात पेट्रोल-डीलर्स असोसिएशनने 1 फेब्रुवारीपासून सायंकाळी 7 ते सकाळी 7 यावेळेत शहरातील पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुसर्‍या दिवशीही या निर्णयानुसार शहरातील पंप बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे या निर्णयाबाबत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनीही कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी वाहनधारकांना दुसर्‍या दिवशीही त्रास सहन करावा लागला. गुरुवारचा अनुभव पाहता, सायंकाळी 7 वाजता पेट्रोल मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने अनेकांनी दिवसभरातच पेट्रोल भरून घेण्याची काळजी घेतली. 

समन्वयाचा अभाव...

आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. लेखी तक्रार किंवा निवेदन आले नाही, असे सांगत जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या स्तरावर डीलर्सची बैठक घेत इथेनॉलमिश्रित पेट्रोलबाबत जनजागृती करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अकिल अब्बास यांनी दिली.