Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Aurangabad › मी तुमची दूत... लाख मोलाचा जीव गमावू नका!

मी तुमची दूत... लाख मोलाचा जीव गमावू नका!

Published On: Jul 27 2018 8:14AM | Last Updated: Jul 27 2018 8:14AMपरळी : प्रतिनिधी

मी जातीपातीचे राजकारण करायला येथे आलेले नाही, तर जातीपातीच्या भिंती तोडायला आले आहे. मराठा आंदोलकांची दूत म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मी पाठपुरावा करेन. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला आपण सगळे मिळून भाग पाडू. पण, आंदोलकांनी आपला लाख मोलाचा जीव गमावू नये, असे आवाहन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथे मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करणार्‍या मराठा कार्यकर्त्यांसमोर केले.

मराठा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी पंकजा मुंडे परळीत दाखल झाल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. ठिय्या आंदोलन करणार्‍या लोकांशी बोलायला आमदार किंवा मंत्री म्हणून आलेले नाही तर तुमच्या संवेदना जाणणार्‍या आणि तुमच्यात वावरणार्‍या वंचितांचे नेतृत्व करणार्‍या व्यक्‍तीची कन्या म्हणून मी आलेली आहे. आरक्षणाचा निकाल माझ्या हातात असता किंवा मुख्यमंत्र्यांच्या हातात जरी असता
तरी तो लगेच झाला असता. पण आता आरक्षण देऊन ते कोर्टात टिकले नसते. कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी निर्णय घेणार्‍या यंत्रणेला तो लवकर घेण्यासाठी भाग पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी मी आंदोलन करणार्‍या लोकांच्या सोबत असेन. मुख्यमंत्रीदेखील याविषयात संवेदनशील आहेत. तेसुद्धा याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी या कामी  आपली दूत म्हणून काम करणार आहे. यासाठी मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानांकडे जाण्याची गरज पडली तरी मी स्वतः तिथे जाईन, असेही त्या म्हणाल्या.

सरकारने जाहीर केलेल्या मराठा समाजासाठीच्या योजना न राबवता जर सरकारी यंत्रणा खोटी आकडेवारी देत असेल तर त्या यंत्रणेलादेखील ताळ्यावर आणता येईल, पण एक मराठा लाख मराठा असल्याने आपला लाख मोलाचा जीव कोणी देऊ नका ही विनंती करण्यासाठी मी इथे आले आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.