Sun, Mar 24, 2019 10:28होमपेज › Aurangabad › पोलिसांनो... लोका सांगे ब्रह्मज्ञान नको!

पोलिसांनो... लोका सांगे ब्रह्मज्ञान नको!

Published On: Dec 07 2017 3:48PM | Last Updated: Dec 07 2017 3:42PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

पोलिस आहोत म्हणून काय झाले? जर इमर्जन्सी नसेल तर पोलिसांच्या वाहनानेही सिग्नल तोडू नयेत, असे पत्र बुधवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी सर्व सहायक आयुक्त, शाखाप्रमुख आणि पोलिस ठाण्यांना दिले. जर आपणच नियम पाळले नाहीत तर सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवालही आयुक्तांनी या पत्रात केला आहे. त्यामुळे यापुढे पोलिसांचे वाहन सिग्नल तोडताना दिसले की, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. 

जालना रोड, बीड बायपास, जळगाव रोड आदी भागांत शहरात नेहमी वाहतूक विस्कळीत होत असते. त्यामुळे वाहतूक पोलिसही याच भागात जास्त नेमलेले असतात. सिग्नल तोडणे, राँगसाइड घुसणे, वन वेमध्ये घुसखोरी करणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, अशा वाहतूक नियमांचा भंग येथील वाहनचालक नेहमी करतात. जालना रोडवर सिग्नल तोडण्याचे प्रमाण जास्त आहे. सिग्नल तोडल्यामुळेच आतापर्यंतचे मोठे अपघात झालेले आहेत. 

सिग्नल सुटण्यापूर्वीच सुसाट निघून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक दुचाकीस्वारांना अवजड वाहनांनी चिरडलेले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांची वाहनेही सिग्नल तोडून सुसाट निघून जातात. हा प्रकार बुधवारी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कानावर घालण्यात आला. याची आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन, जर पोलिसच नियम पाळत नसतील, सिग्नल तोडून पळत असतील तर सर्वसामान्य वाहनचालकांकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल उपस्थित करीत तत्काळ उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना सांगून सर्व ठाणे, शाखा प्रमुख, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त यांना पत्र देऊ न यापुढे पोलिसांच्या वाहनानेही सिग्नल तोडू नयेत, असे आदेश दिले. यानंतरही जर पोलिसाच्या एखाद्या वाहनाने सिग्नल तोडल्याचे स्पष्ट झाले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्हीत हा प्रकार तपासला जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.  

उपायुक्तांचा जावईशोध

औरंगाबादेत पुण्याइतकी वाहतूक जाम नसते. पुण्याच्या तुलनेत औरंगाबाद शहरातून वाहनचालक लवकर बाहेर पडतात, असे सांगून औरंगाबादची वाहतूक सुरळीत सुरू असल्याचा जावईशोध उपायुक्तांनी लावला. मुळात पुण्याच्या वाहतुकीशी औरंगाबादची तुलनाच होऊ शकत नाही. तसेच, पुणे शहराची हद्द ही औरंगाबादपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे तेथे जास्त वेळ लागतो, हा साधा मुद्दाही त्यांनी लक्षात घेतला नाही.