Sat, Apr 20, 2019 18:10होमपेज › Aurangabad › एकच फ्लॅट चौघांना विकला

एकच फ्लॅट चौघांना विकला

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:31AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

एकच फ्लॅट चौघांना विक्री करून लाखो रुपयांचा चुना लावणार्‍या बिल्डर प्रफुल्ल मधुकर मांडे (रा. एन-4, गुरूसहानी नगर, सिडको) याच्याविरुद्ध गुरुवारी (दि. 22) सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. मांडेने 12 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, मांडेविरुद्ध यापूर्वीही अशाच स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. त्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटकही केली होती. तो सध्या हर्सूल कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत दत्ताराव खंदारे (48, रा. विवेकानंद नगर, घारे कॉलनी, ता. मंठा, जि. जालना) यांनी सातारा ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी 8 जून 2016 रोजी सुंदरवाडीतील गट. क्र. 31 मध्ये फ्लॅट क्र. ए-13 खरेदी केला होता. 8 सप्टेंबर 2016 रोजी खंदारे यांनी मांडेला 2 लाख 90 हजार रुपये दिले. त्यापूर्वी वेळोवेळी 9 लाख 60 हजार रुपये देण्यात आले होते.

एकूण 12 लाख 50 हजार रुपये घेतल्यानंतर बीड बायपासवरील रजिस्ट्री कार्यालयात खरेदीखत करण्यात आले. दरम्यान, त्यानंतर हाच फ्लॅट अभिजित सतीशकुमार बाफना, कैलास नानासाहेब पवार आणि गालेब सलीम हिलाबी यांना यापूर्वी विक्री केल्याचे समोर आले. या प्रकरणात खंदारे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने बिल्डर प्रफुल्ल मांडेविरुद्ध सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास हवालदार दाभाडे करीत आहेत. 

कसा उघड झाला प्रकार....
खरेदीखत झाल्यावर भारत खंदारे यांनी फ्लॅटला कुलूप लावले. काही दिवसांनी ते तेथे राहायला गेले. त्यानंतर अभिजित बाफना, कैलास पवार आणि गालेब सलीम हिलाबी हे सदरील फ्लॅट पाहण्यास गेले. तर, तेथे खंदारे आधीपासूनच राहात असल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांनी नोंदणीकृत खरेदीखत दाखविले. या प्रकारामुळे खंदारे यांना धक्‍का बसला. तसेच, बिल्डर मांडे याने आपली फसवणूक केल्याचे समोर आले.