Wed, Mar 27, 2019 01:57होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी पुन्हा ‘जय बाबाजी’!

औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी पुन्हा ‘जय बाबाजी’!

Published On: Jan 21 2018 10:04AM | Last Updated: Jan 21 2018 10:04AMऔरंगाबाद : विनोद काकडे

आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबादेत पुन्हा एकदा खा. चंद्रकांत खैरेंविरुद्ध महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराज असा रंगतदार सामना पाहावयास मिळणार हे निश्‍चित झाले आहे. भाजपने उमेदवारी दिल्यास भाजपकडून, नाही तर अपक्ष; परंतु भक्‍त परिवाराच्या इच्छेखातर आपण यंदाची लोकसभा निवडणूक लढविणारच, असे शांतिगिरी महाराजांनी शनिवारी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. बाबांच्या या
निर्धारामुळे खा. खैरेंना ही निवडणूक अवघड जाण्याची चिन्हे आहेत.

वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे प्रमुख, महामंडलेश्‍वर शांतिगिरी महाराजांचा मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि खान्देशात मोठा प्रभाव आहे. औरंगाबाद आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांच्या आग्रहाखातर शांतिगिरी महाराजांनी 2009 मध्ये औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत उडी घेतली होती. त्यावेळी अपक्ष असतानाही भक्‍तांच्या पाठबळावर खा. खैरे यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले होते. त्या निवडणुकीत महाराजांचा पराभव झाला तरी त्यांना एक लाख 48 हजार 26 मते, तर काँग्रेसचे उत्तमसिंग पवार यांना दोन लाख 22 हजार 882 मते मिळाली होती. त्यावेळी दोन लाख 55 हजार 896 मते मिळवून, 33 हजार 14 मताधिक्याने खैरे विजयी झाले होते.

शांतिगिरी महाराज 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अलिप्त राहिले. पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी भक्‍त परिवाराने गेल्या काही दिवसांपासून शांतिगिरी बाबांची मनधरणी सुरू केली होती. अखेर महाराजांनी ‘मौन’ सोडत भक्‍तांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्यास भक्‍तांना होकार दिला.

भाजपचे तिकीट?

शिवसेना आणि भाजपमधील मैत्री आता जवळपास संपुष्टात आल्यातच जमा आहे. लोकसभेनंतर कोणतीही निवडणूक उभय पक्षांनी ‘युती’ करून लढलेली नाही. मग त्या ग्रामपंचायती असो की विधानसभा. आगामी लोकसभाही स्वतंत्र लढवण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांनी यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे भाजपने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातही गेल्या काही महिन्यांपासून भाजपची उमेदवार शोध मोहीम सुरू आहे. औरंगाबादसाठी भाजपने बनविलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत शांतिगिरी महाराजांचे नाव सर्वांत आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच संत जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथील आश्रमात आयोजित जनशांती धर्म सोहळ्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हजेरी लावली होती. या निमित्ताने भाजप नेते पहिल्यांदाच शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी गेले होते. तेथेच महाराजांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, याबाबत चर्चा झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. आता भक्‍तांच्या इच्छेखातर खुद्द शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शांतिगिरी महाराजच भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील, असे मानले जात आहे.

... तर शिवसेनेला निवडणूक अवघड

शांतिगिरी महाराजांच्या निर्धारामुळे शिवसेनेला औरंगाबाद लोकसभेची निवडणूक अवघड जाणार हे निश्‍चित. कारण आतापर्यंत सर्व लोकसभा निवडणुका सेना-भाजपने एकत्र लढवल्या आहेत. पुढील वर्षी पहिल्यांदाच ते स्वतंत्र लढणार असल्याने शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार हे स्पष्टच आहे. त्यातच शांतिगिरी महाराजांच्या अनुयायांची एकगठ्ठा मते ठरलेली आहेत. काही झाले तरी ती फुटू शकत नाहीत. त्यामुळे शांतिगिरी महाराज भाजपच्या तिकिटावर किंवा अपक्ष लढले तरी शिवसेनेसाठी ही निवडणूक कसोटीच ठरणार आहे

भाजप किंवा अपक्ष

भक्‍त परिवाराची इच्छा आहे की, मी यावेळी लोकसभेची निवडणूक लढवावी. माझे आयुष्यच जनतेची सेवा करण्यासाठी आहे. जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी देवो अथवा न देवो, मी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे.

- महामंडलेश्‍वर, शांतिगिरी महाराज