Fri, Nov 16, 2018 08:58होमपेज › Aurangabad › अवैध दारू विक्री : महिलांचा सहभाग आणि पोलिसांसमोर पेच

अवैध दारू विक्री : महिलांचा सहभाग आणि पोलिसांसमोर पेच

Published On: Dec 23 2017 12:10PM | Last Updated: Dec 23 2017 12:08PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

अवैध देशी आणि विदेशी दारूची विक्री करणारे शहरात कमी  नाहीत, मात्र पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी महिलांद्वारे असे धंदे करण्याचेही प्रमाण शहरात वाढल्याचे दिसत आहे. गुरुवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत महिला आरोपींकडून देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

महिला किंवा वयोवृद्ध महिला अवैध दारू विक्री करत असताना त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीचे होते. अनेकदा या महिला आरडाओरड करून पोलिसांवरच भलते सलते आरोप केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गुरुवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय पुरुषोत्तम मुंडले हे गस्तीवर असताना त्यांना शहानगर मसनतपूर येथील एक महिला अवैधरीत्या दारू विकताना आढळून आली. शहानगर मसनतपूर येथून तिला महिला पोलिसांद्वारे अटक करून तिच्याकडून 520 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत एम-सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

वयोवृद्ध महिलेला सोडून दिले 

कांचनवाडीतील काश्मीरनगरात एक महिला देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे पोलिस त्या ठिकाणी पोहचले. कांचनवाडी ते नाथव्हॅली रोडवरील एका घरासमोरच ही अवैध देशी दारू विक्री सुरू होती. मात्र दारू विकणारी महिला  ही वयोवृद्ध असल्याने काय कारवाई करावी असा पेच पोलिसांसमोर होता. त्या महिलेला अटक न करता केवळ  नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तिच्याताब्यातून देशी दारूच्या 364 रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. नंतर सातारा पोलिस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.