Fri, Jul 19, 2019 23:01होमपेज › Aurangabad › बारवालांच्या निवडीवरून राडा

बारवालांच्या निवडीवरून राडा

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 27 2018 12:17AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

स्थायी समितीच्या सदस्य निवडीवरून महानगरपालिकेत गुरुवारी मोठा राडा झाला. शहर विकास आघाडीचे गट नेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांच्या आघाडीकडून दोन सदस्यांमध्ये पुन्हा एकदा स्वतःच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे आघाडीच्या काही नाराज नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बारवाल यांच्या दालनात धुडगूस घातला. बारवाल यांना शिवीगाळ करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांच्या नावाची पाटीही काढून फेकली. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आणि जिल्हाप्र्रमुख अंबादास दानवे यांनी तिथे येऊन मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलक तेथून निघून गेले. 
मनपा स्थायी समितीचे आठ नवीन सदस्य निवडण्यासाठी गुरुवारी सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. त्याआधीच दुपारी मनपातील राजकीय वातावरण तापले. भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेवक गजानन बारवाल यांनी मनपा सार्वत्रिक निवडणुकीनंतर 13 नगरसेवकांची मोट बांधून शहर विकास आघाडी स्थापन केली. त्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी ते स्थायी समितीत आले. वर्षभर सदस्य राहून बाहेर पडले. गतवर्षी पुन्हा ते सदस्य म्हणून स्थायीत आले तसेच त्यांनी भाजपच्या कोट्यातून सभापतिपद मिळविले.

आता त्यांची मुदत 1 मे रोजी संपत आहे. यावेळी आघाडीकडून दोन सदस्य स्थायीत जाणार होते. त्यासाठी बारवाल यांनी एक सत्यभामा शिंदे यांचे आणि दुसरे स्वतःचे नाव दिले. त्याची माहिती मिळताच आघाडीचे कैलास गायकवाड, रमेश जायभाय, राहुल सोनवणे, गोकूळ मलके आदी नगरसेवक कार्यकर्त्यांसह बारवाल यांच्या दालनात पोहचले. त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक राजू शिंदे, महापौर भगवान घडामोडे आदीही होते. नाराज नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारवाल यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप करीत त्यांना धारेवर धरले. यावेळी काही तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळही केली. प्रकरण अधिकच गंभीर बनल्याने प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच सेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी बारवाल यांच्या दालनात धाव घेऊन त्यांना साथ दिली. या दोन्ही नेत्यांनी आंदोलकांना समजावून सांगत बाहेर जायला लावले. जाता जाताही नाराज नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बारवाल मुर्दाबाद आणि गद्दार है अशा घोषणा दिल्या. तसेच दालनावरील नेमप्लेट काढून फेकली. 

भाजपच्या सदस्यांनीही घेतले तोंडसुख : शहर विकास आघाडीतील नाराज नगरसेवक बारवाल यांच्याशी भांडत होते. यावेळी भाजपच्या काही नगरसेवकांनीही नाराज नगरसेवकांची साथ देत बारवाल यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यात भाजपचे माजी महापौर भगवान घडामोडे, राजू शिंदे आदींचा समावेश होता.

शब्द पाळला नाही : गायकवाड

बारवाल यांनी इतर सदस्यांना शब्द दिला होता. भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या सांगण्यावरूनच आम्ही आघाडीत आलो होतो. दोघांनीही शब्द पाळला नाही. तनवाणी यांची स्थिती खैरेंसारखी झाली आहे. तेही कुणाचा शब्द पाळत नाहीत, असे नगरसेवक कैलास गायकवाड म्हणाले.

शहर विकास आघाडीत फूट

सभापती गजानन बारवाल यांच्या स्थायी समितीमधील पुनर्प्रवेशामुळे शहर विकास आघाडीत उभी फूट पडली आहे. आघाडीतील 13 पैकी सात सदस्य बाजूला झाले असून त्यांनी गटनेता बदलाची मागणी विभागीय आयुक्‍तांकडे लेखी स्वरूपात केली आहे. मनपा सार्वत्रिक निवडणुकीनंतर बारवाल यांनी भाजप पदाधिकार्‍यांच्या मदतीने अपक्ष आणि इतर काही पक्षांच्या 13 नगरसेवकांची मोट बांधून शहर विकास आघाडी स्थापन केली होती. मात्र गुरुवारी या आघाडीत फूट पडली. बारवाल यांनी पुढील वर्षासाठी स्थायी समिती सदस्यत्वाकरिता स्वतःचेच नाव दिले. त्यानंतर नाराज झालेल्या सात जणांनी शहर विकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गोकूळ मलके, कैलास गायकवाड, रमेश जायभाये, राहुल सोनवणे, सुनीता चव्हाण, अंकिता विधाते, ज्योती मोरे यांचा समावेश आहे. या सात सदस्यांच्या सह्यांचे तसे पत्र नगरसचिव आणि विभागीय आयुक्‍तांकडेही सादर करण्यात आले आहे. 

भाजपत तनवाणींची अवस्था सेनेतील खा. खैरे यांच्याप्रमाणे झाली आहे. भाजपत आता त्यांचा शब्दही पाळला जात नाही. सर्व गटांचे गटनेते बेकायदा असून याविरोधात विभागीय आयुक्‍तांकडे तक्रार करणार असल्याचे या नगरसेवकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मलके यांनी तर भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यावरही आरोप केले. बारवालांना सावे यांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे आपण त्यांना आपल्या वॉर्डात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. गटात फूट पडल्याने आता शहर विकास आघाडीत बारवाल यांच्यासह शोभा बुरांडे, कीर्ती शिंदे, राजू तनवाणी, सत्यभामा शिंदे, विमल कांबळे हे सहा जणच उरले आहेत.

Tags : Auangabad, objection, selection