Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Aurangabad › तज्ज्ञ अभियंते नसल्याने जीवाशी खेळ

तज्ज्ञ अभियंते नसल्याने जीवाशी खेळ

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 30 2018 12:37AMऔरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

अभियांत्रिकी आणि स्वच्छता विभागात अनुभवी व तज्ज्ञ स्टाफ व पाणीपुरवठा करण्याचे ज्ञान असलेले अधिकारी व कर्मचारी नसल्याने छावणी परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. मात्र या घटनेला पाच महिने उलटून देखील परिषदेनी अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही.

छावणी परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात परिषदेतर्फे दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आल्याने सुमारे सहा हजार नागरिकांना गॅस्ट्रोची बाधा झाली होती. चौकशी केल्यावर अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभाची स्वच्छताच करण्यात आली नसल्याचे समोर आले होते. तसेच अधिक तपासात पुरवठा करणारी पाईपलाईन ही खामनदीत तीन ठिकाणी लिक झाल्याने त्यातून डे्रनेजच्या घाण पाण्याचा पुरवठा  होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर परिषदेनी तत्काळ हे लिकेज बंद केल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष बिग्रेडिअर अनुराग विज यांनी 24 नोव्हेंबर 2017 रोजी परिषदेच्या बैठकीत या प्रकाराला दोषी कोण यासाठी चौकशी समिती नेमून 5 डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र ही चौकशी देखील रखडली होती. 

अखेर शहरातील आमदारांनी हा प्रश्‍न विधानसभेत उचलल्यानंतर जानेवारीमध्ये अहवाल अध्यक्षांकडे सादर करण्यात आला होता. त्यामध्ये अभियांत्रिकी व स्वच्छता विभागात अनुभवी कर्मचारी व अधिकारी आणि पाणीपुरवठ्याचे कोणतेही ज्ञान नसल्यामुळे ही घटना घडल्याचे म्हटले आहे. तसेच दोन्ही विभागांचा महानगर पालिकेशी किंवा आपसात समन्वय नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 30 वर्षे जुनी असल्याचे म्हटलेले आहे.