Thu, Jan 24, 2019 16:36होमपेज › Aurangabad › विद्यापीठात स्पॉट अ‍ॅडमिशनमध्येही प्रवेशाची बोंब

विद्यापीठात स्पॉट अ‍ॅडमिशनमध्येही प्रवेशाची बोंब

Published On: Jul 05 2018 1:36AM | Last Updated: Jul 05 2018 12:23AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही विभागांच्या रिक्‍त जागा स्पॉट अ‍ॅडमिशनमध्ये आज (दि. तीन) भरल्या गेल्या. मात्र, काहींच्या रिक्‍त राहिल्या. एम. ए. पुरातत्त्वशास्त्र, एम. ए. रशियन आदी अभ्यासक्रमांना प्रवेशाचा भोपळाही फोडता आला नाही. एम. व्होक, लिबरल आर्ट, पाली आणि बुद्धिझम, उर्दू आणि फुले-आंबेडकर विचारधारा या अभ्यासक्रमांचीही दयनीय अवस्था आहे. उपयोजित गणित या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 70 असताना अवघे सहा प्रवेश झाले आहेत. 

सीईटीनंतर तीन फेर्‍या होऊनही पदव्युत्तरच्या अनेक जागा रिक्‍त राहिल्यामुळे आज सीईटीधारकांसाठी स्पॉट अ‍ॅडमिशन प्रक्रिया राबविण्यात आली. यात विज्ञान शाखेच्या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्ण झाले. तथापि, सामाजिक शास्त्रे शाखेच्या अनेक जागा रिक्‍त राहिल्या. या शाखेतील केवळ एम. ए. समाजशास्त्रचे पैकीच्या पैकी प्रवेश झाले आहेत. अर्थशास्त्रात 58 जणांचे प्रवेश झाले. तेथील प्रवेशक्षमता 70 ची आहे. एम. कॉम. आणि एम. ए. योगाला प्रवेश क्षमतेहून अधिक प्रवेश झाले आहेत. या दोन विषयांसह रसायनशास्त्राच्या जागा वाढविण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.