Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Aurangabad › मोदींनी बामूकडे मागितली पुढील शिक्षणाची परवानगी

मोदींनी बामूकडे मागितली शिक्षणाची परवानगी

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे नरेंद्र मोदी यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्याची परवानगी मागितली होती. विद्यापीठाने त्यांना शुभेच्छांसह परवानगी दिली. दुर्दैवाने प्रवेशाची मुदत संपल्यामुळे त्यांना यंदा प्रवेश घेता आला नाही. हे नरेंद्र मोदी पंतप्रधान नाहीत, तर विद्यापीठाचेच कर्मचारी आहेत. 

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचार्‍यांना पुढे शिक्षण घ्यायचे असेल तर प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. विद्यापीठाने 2017-18 मध्ये यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव दिलीप भरड यांचा समावेश होता. 51 अधिकारी व कर्मचार्‍यांनी पुढील शिक्षणासाठी अर्ज केले होते. यात लेखा विभागातील वरिष्ठ सहायक नरेंद्र मोदी यांचाही अर्ज होता. मोदी एम. ए. इंग्रजी करू इच्छितात. समितीने त्यांना पुढील शिक्षणासाठी मुभा दिली. तथापि, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची प्रवेश मुदत संपल्यामुळे त्यांना यंदा प्रवेश घेता आला नाही. ते आता पुढच्या वर्षी प्रवेश घेणार आहेत. समितीकडे सहायक प्राध्यापक, उपकुलसचिव, कक्ष अधिकारी, प्रोग्रामर, वरिष्ठ सहायक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदींनी शिक्षणासाठी अर्ज केले होते. विद्यापीठाने कार्यालयीन वेळ सोडून इतर वेळी शिक्षण घेण्यास त्यांना मुभा दिली. 

फेसबुक अकाउंट उघडण्याची पंचाईत
मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी फेसबुक अकाउंट उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु,  त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने डुप्लिकेट अकाउंट उघडले जाऊ नये म्हणून फेसबुक काळजी घेत असून त्याचा फटका विद्यापीठातील मोदींना बसला.