होमपेज › Aurangabad › डबा घेऊन आला, खून करून गेला 

लग्नाचा तगादा बेतला ‘बाबाच्या’ जिवावर!

Published On: Dec 12 2017 12:19PM | Last Updated: Dec 12 2017 12:19PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

घरी बोलावून चाकूने भोसकून सय्यद अखिल हुसेन सय्यद हमीद हुसेन ऊर्फ हकीम (वय 45, रा. नूर कॉलनी, टाऊन हॉल) या मांत्रिक बाबाच्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर सिटी चौक पोलिसांना यश आले. ज्या घरात खून करण्यात आला, त्या महिलेच्या मुलीसोबत लग्न करण्याचा या बाबाने तगादा लावला होता. त्यातूनच मुलीच्या मामाने बाबाचा काटा काढल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी (दि. 11) चौघांना अटक केली आहे. खमरुन्‍निसा शेख हसन (39), सना शेख हसन (19), तय्यब शेख हसन (21, सर्व रा. रोहिला गल्ली, सिटी चौक) अशी अटकेतील माय-लेकरांची नावे असून त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याशिवाय सनाचा मामा शफिक कादरी यालाही सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर  करण्यात येईल, असे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर-दराडे यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद अखिल हुसेन  सय्यद हमीद हुसेन यांचा ऑप्टिकलचा व्यवसाय होता. दुकान बंद झाल्यामुळे ते काही दिवसांपासून ‘हकीम’ म्हणून काम करीत होते. तो मांत्रिक बाबा म्हणूनही ओळखला जात होता. या ‘बाबा’गिरीतूनच त्याची रोहिला गल्लीतील खमरुन्‍निसा शेख हसन हिच्याशी ओळख झाली. या ओळखीतून त्यांचे नेहमी घरी येणे-जाणे सुरू होते. खमरुन्‍निसा ही तिची मुलगी सनाला घेऊन अनेकदा सय्यद अखिल यांच्या घरी जात होती. त्यातून बाबाला ती मुलगी आवडली आणि त्याने लग्नासाठी तगादा लावला. ही बाब खमरुन्‍निसाच्या भावाला पटलेली नव्हती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

डबा घेऊन आला, खून करून गेला 

सय्यद अखिल, खमरुन्‍निसा आणि सना हे रोहिला गल्लीतील घरात बसलेले असताना सनाचा मामा शफिक कादरी अंदाजे चार वाजेच्या सुमारास जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी आला. त्याने सय्यद अखिल यांना तेथे पाहिले. त्यांच्यावर आधीपासूनच संशय असल्याने शफिक कादरी आणि सय्यद अखिल यांच्यात वाद झाला. यातून कादरी याने अखिल यांच्यावर चाकूहल्ला केला. पोटात, छातीत, गळ्यावर  चाकूने वार केले. यात सय्यद अखिल यांचा मृत्यू झाला. 

पूर्वीही झाला होता वाद

सय्यद अखिल हे ‘हकीम’ म्हणून काम करायला लागल्यापासून त्यांच्याकडे  परिसरातील अनेक लोक यायचे. खमरुन्‍निसा हिच्याशी ओळख झाल्यावर त्यांनी तिच्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता. याला खमरुन्‍निसा आणि तिचा भाऊ शफिक कादरी यांचा विरोध होता. यातूनच शफिक आणि अखिल यांचा पूर्वीही वादही झाला होता.


तय्यबने पुरावे नष्ट केल्याचा संशय 

सय्यद अखिल आणि शफिक कादरी यांचा वाद झाला. त्यानंतर कादरी यांनी चाकूहल्ला करून अखिल यांना ठार केले. हा सर्व प्रकार खमरुन्‍निसा हिच्या घरात
झाला. त्यामुळे घरात रक्‍ताचा सडा पडला होता. मृत अखिल सय्यद यांना घाटीत नेल्यानंतर घरी आलेल्या तय्यब शेख हसन याने घर स्वच्छ करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.