Tue, Nov 20, 2018 06:20



होमपेज › Aurangabad › आशिष साळवेचा खून दोघांनी नव्हे तिघांनी केला

आशिष साळवेचा खून दोघांनी नव्हे तिघांनी केला

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 27 2018 12:10AM



औरंगाबाद : प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत आशिष साळवे याला व्यासपीठावरून दोघा भावांनी नव्हे तर तिघांनी खाली खेचले आणि खून केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. त्याशिवाय आशिषला दोन चाकूने भोसकण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नयन शालिंदर जाधव असे तिसर्‍या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, अविनाश  आणि कुणाल गौतम जाधव यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत 14 एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास रमानगरातील आशिष साळवे  या बँक कर्मचार्‍यावर त्याच्याच घराजवळ राहणार्‍या कुणाल व अविनाश जाधव या दोघांनी आमच्या सोबत का राहात नाही, याचा राग मनात धरून स्टेजवरून खाली ओढत त्याचा चाकूने भोसकून खून केला होता. त्यामुळे रमानगर भागात तणाव निर्माण झाला होता. तसेच जमावाने जाधव बंधूंच्या घरावर दगडफेक केली होती.

दुसर्‍या दिवशी साळवेच्या नातेवाइकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून कुणाल व अविनाश यांना 15 एप्रिल रोजी दुपारी कचनेर येथून अटक केली होती. न्यायालयाने त्यांना 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीदरम्यान, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी जाधव भावंडांकडून चाकू हस्तगत केला. तसेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही मिळविले. शिवाय खून केलेल्या कुणालचे कपडे जप्त केले. मात्र, त्याने घटनेदरम्यानचे कपडे पोलिसांना दिले नाहीत. त्यामुळे पोलिसांना आता त्यावेळचे कपडे जप्त करायचे आहेत. गुरुवारी दोघांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिसरा आरोपी नयन जाधव अद्याप फरार आहे. 

पोलिसांनी क्रांती चौकातील ज्या रविराज मित्रमंडळाच्या स्टेजजवळ ही घटना घडली होती, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहे. त्यामध्ये कुणाल व अविनाश सोबत एक तिसरा हल्लेखोर दिसत आहे. त्यानेदेखील आशिषवर चाकू आणि लाकडी दांड्याने वार केल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दोघा भावांकडे चौकशी केल्यावर तो नयन जाधव असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नयन देखील मारेकरी असल्याचे आशिषच्या नातेवाइकांनीही सांगितले नव्हते. तिघांनी आशिषला स्टेजवरून ओढून दोघांनी चाकूने वार केल्याचे समोर सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्यामुळे नयन पोलिसांच्या हाती लागल्यावर प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Tags : Aurangabad, murder, done,  three, people