Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Aurangabad › म्हणे २० टक्के कचरा उचलला

म्हणे २० टक्के कचरा उचलला

Published On: Apr 22 2018 1:11AM | Last Updated: Apr 22 2018 12:53AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दानुसार महापौर नंदकुमार घोडेले कचरामुक्‍तीच्या कामाला लागले आहेत. पहिला दिवस नियोजनात गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी महापौरांनी सकाळपासूनच शहरातील विविध भागांतील कचरा परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्‍त उदय चौधरी यांनीही प्रत्यक्ष पाहणी करीत कचर्‍याचा आढावा घेतला. महापौर, आयुक्‍तांच्या आदेशानंतर दिवसभरात रस्त्यावरील जवळपास वीस टन कचरा उचण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले.

लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख औरंगाबादला आले होते. शहरात पाऊल ठेवताच त्यांनी कचर्‍याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यापैकी काउंट डाऊन सुरू झाल्यानंतर पहिला दिवस नियोजनातच खर्ची झाला. तर दुसर्‍या दिवशी महापौरांनी पहाटे पाच वाजेपासूनच औरंगपुरा, शहागंज, सेंट्रल नाका, पैठणगेट भागाची पाहणी केली. तसेच मनपाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना कडक शब्दांत सूचना केल्या. महापौरांसोबतच जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी विविध ठिकाणी पाहणी करीत रस्त्यावर पडलेला कचरा त्वरित उचलण्याचे आदेश मनपा अधिकार्‍यांना दिले. त्यानंतर दिवसभरात शहरातील जवळपास अठरा ते वीस टन कचरा उचलून सेंट्रल नाका येथे प्रक्रियेसाठी टाकण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍तभालसिंग यांनी सांगितले. 

कचरा संकलनासाठी तीनशे रिक्षा

औरंगाबाद : प्रतिनिधी

मनपा प्रशासनाने कचरा संकलनासाठी आणखीन 65 खासगी रिक्षा भाडे तत्त्वावर घेतल्या आहेत. तसेच कचर्‍याच्या कामांसाठी 215 मजूरही वाढविले आहेत. यापुढे 115 वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन एक दिवस ओला, दुसर्‍या दिवशी सुका अशा प्रकारे कचरा संकलन केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी शनिवारी (दि. 21) दिली.

शहरात कचराकोंडी निर्माण होऊन तब्बल दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कचराकोंडी फोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कार्य केले जात आहे. रस्त्यावरील कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात आहे.

मनपाच्या आणि खासगी रिक्षाद्वारे कचरा संकलन केले जात आहे. मात्र, अनेक वॉर्डांमध्ये कचरा संकलन केले जात नाही, मनपाचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत, रिक्षा कमी पडत असल्याची ओरड सुरू होती. तसेच आवाहन करूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने कचरा संकलनासाठी आणखीन 65 खासगी रिक्षा भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. आता मनपाच्या 108 आणि खासगी 210 अशा एकूण 318 रिक्षांद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन सुुरू केले आहे. एका वॉर्डात किमान तीन रिक्षांद्वारे कचरा संकलन केले जाणार असून एक दिवस सुका आणि दुसर्‍या दिवशी ओला कचरा गोळा केला जाणार आहे. यासाठी 215 सफाई कामगारही वाढविण्यात आले आहेत.

Tags : Aurangabad,  municipality claims Mayor inspected the case