Tue, Apr 23, 2019 09:40होमपेज › Aurangabad › मिटमिट्यात मनपा आयुक्‍तांना घेरले

मिटमिट्यात मनपा आयुक्‍तांना घेरले

Published On: Feb 25 2018 1:34AM | Last Updated: Feb 25 2018 1:31AMपडेगाव : प्रतिनिधी

कचरा डेपोच्या जागेसाठी चाचपणी करण्यासाठी मनपा आयुक्‍तांसह अधिकार्‍यांचे एक पथक शनिवारी सकाळीच मिटमिट्यात धडकले. तेथील सफारी पार्कच्या नियोजित जागेवर कचरा डेपो सुरू करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहेत. याची माहिती मिळताच परिसरातील गावकर्‍यांचा जमाव जमला. या गावकर्‍यांनी मनपा आयुक्‍तांना घेरले. कोणत्याही परिस्थितीत येथे कचरा डेपो सुरू करू देणार नाही, असे गावकर्‍यांनी सांगत विरोध केला. विशेष म्हणजे याच वेळी एक तरुण हातात रॉकेलचे कॅन घेऊन तेथे पोहचला आणि डेपो येथे येत असेल तर मी जाळून घेतो, असे म्हणत त्याने रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु यावेळी नागरिकांनी रोखल्याने अनर्थ टळला.

मनपाने मिटमिट्यातील आपल्या मालकीच्या गट नंबर 307 मधील नियोजित सफारी पार्कच्या जागेवर हा डेपो हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर, अभियंता सखाराम पानझडे, डॉ. पाटील व इतर अधिकार्‍यांचे पथक सफारी पार्कच्या जागी पोहचले. आयुक्‍तांनी विरोध करणार्‍या या गावकर्‍यांना ‘येथे केवळ कचरा डेपो नाही तर कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, त्यातून खतनिर्मिती करण्यात येईल’ असे सांगत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावेळी एक युवक हातात रॅकेलचा डबा घेऊन आयुक्‍तांसमोर आला. येथे कचरा डेपो आणला तर जाळून घेतो, असे म्हणत त्याने रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नगरसेवक रावसाहेब आमले व इतर नागरिकांनी त्याला रोखले. त्याची समजूत घातली. तेव्हा तो शांत झाला. कचरा डेपो नाही, येथे सफारी पार्कच व्हावे, या मागणीवर गावकरी ठाम राहिले. शेवटी गावकर्‍यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलणार नाही, असे आश्‍वासन मनपा आयुक्‍तांनी दिले. 

मनपा शाळेची केली पाहणी
यावेळी नगरसेवक रावसाहेब आमले यांनी मनपा आयुक्‍तांना मिटमिट्यातील मनपाच्या शाळेच्या दुरवस्थेची माहिती दिली आणि शाळेची अवस्था पाहा असे सांगितले. लगेच आयुक्‍तांनी शाळेला भेट दिली. या शाळेत 600 विद्यार्थी आहेत. वर्ग खोल्यांची दुरवस्था झालेली आहे. बसण्यासाठी जागा नाही. पुरेसे शिक्षक नाहीत हे नगरसेवकांनी लक्षात आणून दिले. त्यावर मनपा आयुक्‍तांनी तत्काळ शाळा दुरुस्त करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.