Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Aurangabad › कला व बुद्धीची सांगड घातल्यास जीवन आनंदी बनते : डॉ. आगाशे

कला व बुद्धीची सांगड घातल्यास जीवन आनंदी बनते : डॉ. आगाशे

Published On: Feb 13 2018 2:53AM | Last Updated: Feb 13 2018 2:11AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

बुद्धी आणि कला यांची सांगड घातल्यास जीवन आनंदी बनते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले. देवगिरी महाविद्यालयात आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव; आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. मंचावर संस्थेचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांची उपस्थिती होती. शाळेतील संस्काराबाबत बोलताना डॉ. आगाशे म्हणाले की, लहानपणापासून आपण जे काही करतो ते आनंदासाठी करत असतो. ज्यांनी अखंड परिश्रमातून आयुष्य घडवले ते सर्व महान लोक सामान्य शाळेतच शिकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा सामान्य शाळेतच शिकले. कारण त्यावेळी शाळेत संस्कार शिकवले जात. आज तसे काही होते का हे शोधावे लागते. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरचे किस्से सांगून त्यांनी तरुणाईला खळखळून हसवले आणि गंभीरही केले. बुद्धी असेल पण रुची नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत. रुचीमुळे बुद्धीची मशागत होते. बुद्धी आणि कुतुहल यातून माणसाला वेगवेगळे अनुभव येतात आणि तो प्रगल्भ होत जातो. आनंदासाठी शक्य तेवढ्या कला अंगी बाणवतो. कला आणि बुद्धी यांची सांगड घातली तर जीवन आनंदी होते, असे ते म्हणाले. चित्रपट समाजाची भाषा बोलत असतात. मात्र आपण त्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे, असे सांगून ताणतणाव घालवण्यासाठी कला आणि आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ते शेवटी म्हणाले.